Savita Prabhune : अशोक समेळ यांचे नाटक ‘कुसुम मनोहर लेले’ (Kusum Manohar Lele) हे मराठी रंगभूमीवरील अढळस्थान प्राप्त झालेले नाटक असून त्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये महत्त्वाची भूमिका करत असलेल्या अभिनेत्री सविता प्रभुणे (Savita Prabhune) यांनी रंगभूमीबाबत सांगितलं. त्या  म्हणाल्या, 'समकालीन रंगभूमी असो किंवा अभिजात, महाराष्ट्राने कायमच वैविध्यपूर्ण आशय दिला आहे. आजही या नाटकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या नाटकाचा भाग होणं, ही कलाकार म्हणून माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. रंगभूमीसाठी सविता ताईंच्या मनात कायमच खास जिव्हाळा राहिला आहे. त्या म्हणाल्या, ‘झी थिएटर त्यांच्या महामंच महोत्सवात मराठी नाटकांना प्रामुख्याने आपल्यासमोर आणत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे.’


‘कुसुम मनोहर लेले’ ही कुसुमच्या फसवणुकीची आणि कोणत्याही परिस्थितीत मूल हवं असण्याच्या वेडाची गोष्ट आहे. तिच्या कारस्थानाला सुजाता बळी पडते. आधी तिला गोड बोलून नात्यात व नंतर आईपणात गुंतवलं जातं आणि त्यानंतर तिचं मूल तिच्यापासून हिरावून घेतलं जातं. सविता म्हणाल्या, ‘या नाटकात मूलभूत भावना मांडण्यात आल्या आहेत आणि दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी त्या फार छान पद्धतीने हाताळल्या आहेत. श्वेता बासू प्रसाद आणि अनंग्शा बिस्वास या अनुक्रमे सुजाता आणि कुसुम साकारणाऱ्या तरुण कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव छान होता.’


हा टेलीप्ले महाराष्ट्रात तयार होणाऱ्या समृद्ध आशयाचे उदाहरण आहे. त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही लेखक, कलाकार किंवा निर्मिती करणाऱ्याला थोड्याशा प्रयत्नांतून विकासाच्या संधी अगदी सहज मिळतात. मी 1983 मध्ये नॅशनल स्कूल ड्रामाची पदवीधर होऊन मुंबईत आले आणि माझ्या यशाचं श्रेय बहारदार मराठी नाटक, सिनेमा आणि टीव्ही क्षेत्राला जातं. आता माझ्या कामाच्या यादीत टेलीप्लेचा समावेश झाला म्हणून मी खूप खूष आहे.’ 'कुसुम मनोहर लेले' टाटा प्ले थिएटरवर प्रसारित होणार आहे. यात गगन रियार, स्नेहा चव्हाण आणि सुनील पुष्कर्णा यांच्याही भूमिका आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या