Chaarchoughi : गेल्या काही दिवसांत मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आली आहेत. तरुणांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली होती. पण काही नाटकांनी तरुणांना पुन्हा एकदा नाट्यगृहाकडे वळवण्याचं काम केलं आहे. आता या यादीत 'चारचौघी' (Chaarchoughi) नाटकाचादेखील समावेश करण्यात येत आहे. 'चारचौघी' नाटकाचा शुभारंभाचा हाऊसफुल्ल प्रयोग पार पडला आहे. 


31 वर्षांपूर्वी 'चारचौघी' हे नाटक मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक ठरलं होतं. 'चारचौघी' हे दर्जेदार नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल्ल पार पडला आहे. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शनिवारी, 17 सप्टेंबरला पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. 






'चारचौघी' हे नाटक आता नव्या संचात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. प्रशांत दळवी लिखित या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं 'चारचौघी' हे नाटक त्याकाळी खूप गाजलं होतं. आता पुन्हा एकदा नाटकाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या नाटकाची प्रतीक्षा करत होते. त्यामुळे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल्ल पार पडला आहे. 


'चारचौघी' या नाटकात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर 'जिगीषा'ने या नाटकाची निर्मिती केली आहे. अशोक पत्की यांनी या नाटकाचं संगीत केलं असून संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची धुरा सांभाळली आहे. 


'चारचौघी' नाटकाचे प्रयोग



  • शुक्रवार 23 सप्टेंबर रात्री 8.30 वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे

  • शनिवार 24 सप्टेंबर दु. 4 वा. डॉ. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली

  • रविवार 25 सप्टेंबर दु. 4.30 वा. गडकरी रंगायतन, ठाणे

  • शनिवार 1 ऑक्टोबर सायं. 5 वा. यशवंतराव चव्हान नाट्यगृह, कोथरुड

  • रविवार 2 ऑक्टोबर दु. 12.30 वा. आणि सायं. 5 वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे