Purshottam Berde New Marathi Drama : लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अशा विविध भूमिकांमधून सर्जनशील मुशाफिरी करणारे ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे (Purshottam Berde) यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे. कलेच्या वेगवेगळया माध्यमातून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची आणि सर्जनशीलतेची किनार दिसून आली आहे. अशा या हुकमी दिग्दर्शकाचे 'सुमी आणि आम्ही' (Sumi Ani Aamhi) हे नवं नाटकं रंगभूमीवर येत आहे. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे तब्ब्ल नऊ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करत आहेत. नाटकाच्या संगीत, नेपथ्याची जबाबदारीदेखील तेच सांभाळणार आहेत.  


'सुमी आणि आम्ही' हे नाटक एप्रिलच्या मध्यावर रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर, श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. 


'सुमी आणि आम्ही'बद्दल पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले...


एका कुटुंबाची कथा सांगणार हे नाटक आहे. आपल्या मुलीचं सुमीचं मिशन पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आई वडिलांची गोष्ट यात सांगितली आहे. या नाटकाच्या दिग्दर्शना विषयी बोलताना पुरुषोत्तम  बेर्डे म्हणाले की,"माझं अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. त्या व्यापात नाट्य दिग्दर्शनासाठी वेळ मिळत नव्हता. राजन मोहाडीकर यांच्या सोबत मी आधी काम केलं होतं. माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली आणि या नाटकाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. ही संधी घेत हे नाटक मी करायला घेतलं. बर्‍याच वेगवेगळ्या माध्यमातून मी नव्या कलाकृती रसिकांसाठी आणणार आहे. 'सुमी आणि आम्ही' ही त्यातील एक कलाकृती असून पारंपरिक बाज असलेलं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल.


पुरुषोत्तम बेर्डे यांचा प्रवास जाणून घ्या...


आजपर्यंत आठ नाटकांचे लेखन, 10 नाटकांचे दिग्दर्शन, एकूण 75 व्यावसायिक नाटकांचे पार्श्वसंगीत, 25 नाटकांचे नेपथ्य, 50 व्यावसायिक नाटकांच्या जाहिरातींची संकल्पना याबरोबरच विविध चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन, साहित्यिक लिखाण करीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी सकस आणि दर्जेदार मेजवानी रसिकांना दिली. पुरुषोत्तम बेर्डे यांचा 1975 पासून सुरू झालेला हा प्रवास आजतागायत सुरू असून कामाठीपुरा (वेबसिरीज), कला पानी (चित्रपट), थरार..२६ जुलैचा (नाटक), जाऊबाई जोरात द्वितीय (नाटक) अशा विविध आगामी कलाकृती ते रसिकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येणार आहेत.


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 03 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!