पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज 12 एप्रिल रोजी 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' (Shivaji Underground In Bhimnagar Mohalla) या नाटकाच्या ठरवलेल्या प्रयोगाला ऐन वेळी परवानगी नाकारून प्रयोग रद्द करण्यास भाग पाडले आहे, अशी फेसबुक पोस्ट नाटकातील कलाकार आणि अभिनेते संभाजी तांगडे (Sambhaji Tangade) यांनी केली आहे. सध्या महात्मा फुले जयंती ते डाॅ. आंबेडकर जयंतीदरम्यान विद्यापीठात महोत्सव सुरू आहे. विद्यापीठातील 'विद्यार्थी विकास मंचा'ने याच महोत्सवात राजकुमार तांगडे लिखित,नंदू माधव दिग्दर्शित आणि लोकशाहीर संभाजी भगत यांची संकल्पना असलेल्या शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. त्यासाठी "विद्यापीठाने परवानगी दिली आहे", असे विद्यार्थी विकास मंचाने आम्हाला 10 दिवसांपूर्वी कळवले होते. त्यानुसार निर्मात्यांनी सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या तारखा घेतल्या, प्रवासाची तिकीटे बूक केली आणि काल अचानकच विद्यापीठाच्या समितीने प्रयोगाला परवानगी नाकारली, असं संभाजी तांगडे यांनी म्हटलं आहे.
संभाजी तांगडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढं म्हटलं की, विशेष म्हणजे मागील वर्षी याच नाटकाचा प्रयोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात झाला होता. मग याच वर्षी नेमकी काय अडचण आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाच्या सेन्साॅर बोर्डाने प्रमाणपत्र दिलेले हे नाटक आहे. गेली 13 वर्षे या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व दिल्लीसह इतरत्र 850 हून अधिक प्रयोग झालेले आहेत.
या नाटकाचे संकल्पना, गीत संगीत लोकशाहीर संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे आणि दिग्दर्शक नंदू माधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक विचार या नाटकातून मांडलेला आहे आणि तो लोकांनीही स्वीकारला आहे. "छत्रपती शिवरायांच्या नावाने जाती-धर्मात द्वेष पसरवू नका", असा स्पष्ट संदेश देणारे हे नाटक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाकारले आहे याचा अर्थ काय समजावा?, असा सवाल संभाजी तांगडे यांनी केला आहे.
संभाजी तांगडे यांनी या प्रकारासंदर्भात आणखी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 12 एप्रिल रोजी या नाटकाचा प्रयोग ठेवला होता. पण ऐन वेळी विद्यापीठाने प्रयोगास परवानगी नाकारली, असं संभाजी तांगडे म्हणाले.
नाटकाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय : संभाजी तांगडे
'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 12 एप्रिल रोजी या नाटकाचा प्रयोग ठेवला होता. पण ऐन वेळी विद्यापीठाने प्रयोगास परवानगी नाकारली, असं संभाजी तांगडे म्हणाले.
20 मे 2012 रोजी हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आले. या नाटकाची संकल्पना लोकशाहीर संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे, दिग्दर्शक नंदू माधव आहेत. 20 मे च्या प्रयोगानंतर महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांनी या नाटकावर भरभरून लिहिलं, यात ज्येष्ठ समीक्षक शांता गोखले, कमलाकर नाडकर्णी, जयंत पवार, रवींद्र पाथरे, युवराज मोहिते यांनी लेख लिहिले. इलेक्ट्रॉनिक मीडियाने या नाटकाबद्दल कौतुक करणारे अनेक शो केले. महाराष्ट्रातील विचारवंत व साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, आ. ह. साळुंखे ते आसाराम लोमटेंपर्यंत सर्व दिग्गजांनी या नाटकाचं भरभरून कौतुक केलं.सामाजिक चळवळीतले नरेंद्र दाभोळकर, धनाजी गुरव यांच्यापासून ते आमच्या सेलूच्या अशोक उफाडेंपर्यंत, नाट्यक्षेत्रातील डॉक्टर श्रीराम लागूंपासून भरत जाधव, मकरंद अनासपुरे, विना जामकर यांच्यापर्यंत, राजकारण्यांमध्ये आमच्या जालन्याच्या अर्जुन खोतकरांपासून शरद पवारांपर्यंत सर्वांनी पाठबळ दिले आहे, असं संभाजी तांगडे म्हणाले.
दरम्यान, शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला या नाटकाला परवानगी का नाकारण्यात आली यासंदर्भातील विद्यापीठाची बाजू समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या :