मुंबई : अखिल  भारतीय नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या मराठी व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा काल झाली. निर्माते संतोष काणेकर यांची या संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश महाराव यांची निवड झाली. नव्या कार्यकारिणीची बहुमताने निवड झाली आहे. आता नव्याने कारभार हाती घेतल्यानंतर कोरोनाकाळात रंगमंच कामगारांसाठी असलेला प्रस्तावित निधी तातडीने देण्यावर प्राधान्याने पावलं उचलली जातील असं स्पष्टीकरण अध्यक्ष काणेकर यांनी दिलं.


कोरोना काळात निर्मात्यांना केल्या जाणाऱ्या मदतीवरून निर्माता संघात राजीनामा नाट्य रंगलं होतं. त्यावेळी मतभेद होऊन निर्माते अजित भुरे, विजय केंकरे, वैजयंती आपटे, प्रशांत दामले, राकेश सारंग, सुनील बर्वे, चंद्रकांत लोकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकारिणी बरखास्त झाली होती. त्यामुळे निवडणूक घेणं आवश्यक होतं. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी निर्माते प्रदीप कबरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं.


नव्याने तयार झालेली कार्यकारिणी अशी, अध्यक्ष - संतोष काणेकर, उपाध्यक्ष - ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह - राहुल भंडारे, सहकार्यवाह - सुशील आंबेकर, खजिनदार - दिनू पेडणेकर, उपखजिनदार - देवेंद्र पेम. या शिवाय पाच महिला सदस्यांची निवड या कार्यकारिणीवर करण्यात आली आहे. यात पद्मजा नलावडे, ऐश्वर्या नारकर, अनुराधा वाघ, संजिवनी जाधव, ऋजुता चव्हाण यांचा समावेश होतो. निर्माता संघाच्या ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिलांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे.


निर्माता संघाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर निर्माते संतोष काणेकर म्हणाले, 'येत्या काळात संघ बरीच कामं करेल. पण सुरुवातीला रंगमंच कामगारांना मदत देणं आणि एकूण थिएटर्सची कोरोना काळानंतरची व्यवस्था यावर जास्त भर दिला जाणार आहे. नाट्यगृह लवकर चालू करा अशी मागणी आम्ही करणार नाही. कारण, प्रेक्षकांची सुरक्षितता हा महत्वाचा मुद्दा आहे. पण नाट्यगृहांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या त्या भागातल्या थिएटरजवळ राहणाऱ्या लोकांची समिती करुन ते ते प्रश्न सोडवण्यावर भर असणार आहे.'


ही नवी कार्यकारिणी 2020 ते 2025 या पाच वर्षांसाठी असणार आहे. यावेळी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष, निर्माते प्रसाद कांबळी, भरत जाधव, ज्ञानेश महाराव, ऐश्वर्या नारकर, संजिवनी जाधव आदी मंडळी हजर होती. यावेळी एकूण 33 निर्माते उपस्थित असल्याची माहीती राहुल भंडारे यांनी दिली.



महत्त्वाच्या बातम्या :