Paach Futacha Bacchan Marathi Natak : गेल्या काही दिवसांपासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटकं येत आहेत. अशातच आता 'पाच फुटाचा बच्चन' (Paach Futacha Bacchan) हे मराठी नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. नुकताच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला असून या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच प्रयोगाने नाट्यरसिकांना भुरळ घातली आहे.
'पाच फुटाचा बच्चन' या नाटकाला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी दिसून आले आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृहात 5 फेब्रुवारीला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला. नाट्यरसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला आहे.
समकालीन वास्तव मांडणारा 'पाच फुटाचा बच्चन'
'पाच फुटाचा बच्चन' या नाटकाचा आशय हा समकालीन वास्तव मांडणारा असून त्याची भाषा आणि सादरीकरण सर्वसामान्य रसिकाला आवडेल अशी आहे. शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि शहरी भागातील जनतेपासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना मनापासून साद घालणारे हे नाटक असून ते या काळाचे वास्तव आपल्यासमोर मांडते, असे मत प्रेक्षकांनी मांडले.
समाजभान जागृत आणि व्यापक करणारे 'पाच फुटाचा बच्चन'
जाणकार म्हणाले,"लेखन,अभिनय, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा या सर्वच बाबतीत 'पाच फुटाचा बच्चन' हे नाटक दर्जेदार असून समाजभान जागृत आणि व्यापक करणारे आहे. खरीखुरी संत परंपरा उलगडणारे हे नाटक केवळ पुण्या-मुंबईतील प्रेक्षकांपुरते मर्यादित न राहता राज्यातील अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे".
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला 'पाच फुटाचा बच्चन'चा शुभारंभाचा प्रयोग!
सर्वसामान्य रसिकांसह अनेक मान्यवरांनी 'पाच फुटाचा बच्चन' हे नाटक पाहायला गर्दी केली होती. सुनील सुकथनकर, शिल्पा बल्लाळ, अमोल देशमुख यासारख्या चित्रपट- नाटयक्षेत्रातील मंडळींसोबतच महावीर जोंधळे, इंदूमती जोंधळे, श्रुती तांबे, सुचेता घोरपडे, प्रमोद मुजूमदार, मोहन देस अशी साहित्यिक मंडळी आणि अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
'पाच फुटाचा बच्चन'बद्दल जाणून घ्या...
गावाखेड्यातून आलेल्या एका सुपरस्टारच्या आयुष्यावर भाष्य करणारं 'पाच फुटाचा बच्चन' हे नाटक आहे. एक सर्वसामान्य मुलगा ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात येणारं वादळ अशा अनेक गोष्टी या नाटकात दाखवण्यात आल्या आहेत. हे नाटक पाहताना प्रेक्षक हसता-हसता अंतर्मुख होतो. कौस्तुभ देशपांडेने हे नाटक लिहिलं असून श्रुती मधुदीपने या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या