मुंबई : लॉकडाऊन लागला आणि नाट्यक्षेत्राचं पुढे काय होणार याबद्दल अनेक शंका मनात येऊ लागल्या. अर्थात नाट्यकर्मींना अनेक संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत दिलीच. पण अखिल भारतीय नाट्यपरिषदेनेही रंगकर्मींना मदत देऊ केली. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी तातडीने पावलं उचलंत रंगमंच कामगारांपासून नाट्यकलावंतांपर्यंत अनेकांना मदत दिली. पण ही मदत दिल्यानंतर नाट्यपरिषदेत नवा वाद उद्भवला. गेल्या काही महिन्यांपासून ही अंतर्गत धुसफुस चालू आहे. आता येत्या 13 जानेवारीला होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.


येत्या 13 जानेवारीला मुंबईत नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ही बैठक घेता आली नव्हती. दरम्यान जे काही निर्णय परिषदेने घेतले ते ऑनलाईन बैठकांचं आयोजन करून घेण्यात आले. पण त्यातून नियामक मंडळात अस्वस्थता वाढली. काहींनी प्रसाद कांबळी यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप केले. अनेक नियामक मंडळ सदस्यांनी याबद्दल आपली नाराजी नाट्यपरिषदेचे तहहयात विश्वस्त असलेल्या शशी प्रभू यांच्याकडेही मांडली. त्यानंतर विश्वस्त काय निर्णय घेतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान लॉकडाऊननंतर नियामक मंडळाची बैठक घेतली जाणारच आहे असं नाट्यपरिषदेचे प्रवक्ते, दिग्दर्शक मंगेश कदम यांनीही सांगितलं होतं. आता अनेक गोष्टी पूर्वपदावर आल्यानंतर ही बैठक होणार आहे.


13 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत गेल्या वर्षी घेता न आलेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनावर चर्चा होणं अपेक्षित आहे. यंदा होणारं संमेलन शंभरावं असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्व आहेच. त्यामुळे आता कोरोना काळात त्याचं आयोजन आणि समन्वय आदी गोष्टींवर या नियामक मंडळात चर्चा होईल. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब अशी की सध्या नाट्यपरिषदेच्या चालू असलेल्या कारभाराबाबात नियामक मंडळातल्या 59 पैकी 34 जणांनी नाराजी नोंदवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येकाने पत्र लिहून प्रसाद कांबळी व त्यांचे परिषदेतील पदाधिकारी नियामक मंडळातील सदस्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याचा ठपका ठेवला आहे. तर परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी परिषद करत असलेली सर्व कार्यवाही ही नियमाला धरुन असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.


एकिकडे सत्ताधारी  पदाधिकारी आपलं कामकाज योग्य रितीने चालू असल्याचं सांगत असतानाच, दुसरीकडे 59 पैकी 34नियामक मंडळातल्या सदस्यांनी या कामकाजाविरोधात नाराजी नोंदवली आहे. याबद्दल अधिकृतरित्या सध्या कोणीही बोलत नसून आपण जे काही बोलू ते थेड नियामक मंडळाच्या बैठकीतच बोलू असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. तसं झालं तर विद्यमान अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना आपलं बहुमत पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. तसं न झाल्यास कांबळी यांना पायउतार व्हावं लागेल.


13 जानेवारीच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसाद कांबळी यांनी आपलं बहुमत सिद्ध केल्यास, नाट्यसंमेलनाचा निर्णय होईल. जर हे बहुमत सिद्ध झालं नाही, तर मात्र नव्या अध्यक्षासाठीच्या निवडप्रक्रियेला सुरुवात होईल.