NSD  Bharat Rang Mahotsav 2024 : प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्यावतीने (National School Of Drama)  ‘भारंगम’ नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या नाट्यमहोत्सवात विविध भाषांमधील नाटकांचे सादरीकरण होत आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा नाट्यमहोत्सव 21 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहे. देशातील विविध शहरांमध्ये या महोत्वाअंतर्गत नाटकांचे सादरीकरण होणार आहे. दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ या नाटकाला विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. 


दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ या नाटकाला, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित ‘भारंगम’ नाट्यमहोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतल्या श्रीराम सेंटरमध्ये बुधवार,  14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या नाटकाचा प्रयोग सादर होईल. सोशल नेटवर्किंग फोरम आणि स पा न, नाशिक यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.


महाराष्ट्रात वर्षभर गाजत असलेल्या या नाटकाला महेश एलकुंचवार, राजीव नाईक, सतीश आळेकर, मोहन आगाशे यांच्यासह अनेक दिग्गज आणि समीक्षकांनी गौरवलं आहे. त्यामुळेच भारंगमच्या विशेष सल्लागार समितीनं थेट महोत्सवात हे नाटक सादर करण्याचं निमंत्रण दिले आहे.


नाटकाची कथा काय?


सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय आणि आर्थिक समतोल राखण्याच्या अपयशातून एका 35 शीतील स्वत्व हरवलेल्या संवेदनशील शेतकरी तरुणाची कथा “तो राजहंस एक” या नाटकातून मांडली आहे. त्याची छिन्नमनस्कता, त्यातून वाढत जाणारे कौटुंबिक प्रश्न, शेतकरी असल्यानं पस्तिशी उलटूनही न होणारं लग्न, यातून साचत गेलेलं अपराधीपण, अनेक नकारातून बळावत गेलेला मानसिक आजार आणि त्यातून सुटकेसाठी तयार केलेलं प्रेयसीचं प्रतिविश्व यातून हे नाटक पुढे जात एक समकालिन सामाजिक भाष्य करतं.


नाटकात कलाकार कोणते?


या नाटकात  नाट्यलेखक आणि ‘देवबाभळी’कार प्राजक्त देशमुख, अनिता दाते यांच्यासह अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन, राजेंद्र उगले, प्रणव प्रभाकर यांच्या भूमिका आहेत. सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड हे निर्माते आहेत. प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित आणि प्रणव सपकाळे यांची आहे. संगीत रोहित सरोदे यांचं असून, संगीत संयोजन अथर्व मुळे यांचं आहे. चेतन बर्वे व लक्ष्मण कोकणे यांचं नेपथ्य तर रंगमंच व्यवस्था राहुल गायकवाड यांची आहे.


'भारंगम'चे आयोजन कोणत्या शहरांमध्ये ?


या नाट्यमहोत्सवाचे आयोजन दिल्ली,मुंबई सह आगरतळा, बेंगळुरू, भुज, भुवनेश्वर, दिब्रूगड, गंगटोक, जोधपुर, पाटणा, पुणे, रामनगर, श्रीनगर, वाराणसी आणि विजयवाडा मध्ये करण्यात आले आहे. या महोत्सवात रंगभूमीशी निगडीत असलेले विविध कार्यक्रम कलाकृती सादर करण्यात येणार आहे.