मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा वाजणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदच्या सदस्यांनी आज (शुक्रवार 3 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement


या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष नवनाथ मच्छिंद्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी उपस्थित होते. रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे यांनी आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे आदेश बांदेकर, सुबोध भावे या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्यगृह 50% प्रेक्षक उपस्थितीमध्ये 5 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले आहे.


BLOG : संचालनालयाचे 'अ'सांस्कृतिक कार्य!


एक वर्षाहून अधिक काळापासून नाट्यगृह बंद
राज्यातील नाट्यगृह उघडण्यासाठी 9 ऑगस्टला रंगकर्मी-रंगधर्मींचं आंदोलन झालं. वारंवार विनंती-आर्जवं करणारे लोककलावंत, रंगकर्मी, सिनेधर्मी ही सगळी मंडळी रस्त्यावर उतरली. मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हा जागर झाला, ही अत्यंत महत्वाची घटना होती. कारण, गेल्या 15 महिन्यांपासून सांस्कृतिक क्षेत्राला लागलेला ब्रेक काही केल्या जात नव्हता. अटी-शर्तींसह का असेना पण हे सांस्कृतिक क्षेत्र काही प्रमाणात तरी खुलं करा ही त्यातली मुख्य आणि एकमेव मागणी होती. आक्रोश त्याबद्दलचा होता. जगणं किती कठीण झालं आहे याकडे सरकारचं लक्ष वेधून घेणं हा उद्देश होता आणि त्यानंतर सरकारकडून ठोस काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा होती. उशीरा का होईना नाट्यगृह सुरु होत असल्याने नाट्यकर्मींनी समाधान व्यक्त केलं आहे. मागील वर्षभरापासून नाट्यकलाकार आणि या संदर्भातील मंडळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करत होते. अखेर हा निर्णय घेण्यात आल्याने आता आमची रोजीरोटी सुरु होईल, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.