पुणे : जवळपास आठ महिने बंद असलेल्या नाट्यसृष्टीमध्ये आता काहीशी हालचाल होऊ लागली आहे. राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकसंख्येच्या नियमानिशी थिएटर्स उघडायला परवानगी दिल्यानंतर अनेक नाट्यनिर्मात्यांनी नव्याने नियोजन करायला सुरुवात केली होती. आता अखेर तो शुभमुहूर्त गवसला आहे. लॉकडाऊननंतर सुरु होणाऱ्या न्यू नॉर्मलमध्ये नाट्यप्रयोगांना सुरुवात होतेय ती पुण्यातून. नाटकांबाबत चोखंदळ आणि तितकंच प्रेम असणाऱ्या पुणेकरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे.


पुण्यात डिसेंबरमध्ये नाटकांना सुरुवात होते आहे. नेहमी हाऊसफुल्लचा बोर्ड घेणारी दोन नाटकं डिसेंबरमध्ये पुण्यात दाखल होत आहेत. या नाट्यप्रयोगांपैकी 12 डिसेंबरला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. तर 13 डिसेंबरला दुपारी बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाचा प्रयोग होईल आणि 13 तारखेला संध्याकाळी चिंचवडमध्ये या नाटकाचा पुढचा प्रयोग होईल. विशेष बाब अशी की, त्याच्या पुढच्या आठवड्यात भरत जाधव यांची मुख्य भूमिका असणाऱ्या पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोगही होणार आहे. याबद्दल माहिती देताना पुण्याचे नाट्यप्रयोगांचे समन्वयक समीर हंपी म्हणाले, 'पुण्यात रसिकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद असतो. लॉकडाऊननंतर नाटकांच्या प्रयोगांना पुण्यातून सुरुवात होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. राज्य सरकारने घालून दिलेले सगळे नियम पाळून हे नाट्यप्रयोग होतील.'


अनेक महिन्यांपासून पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमही झालेले नाहीत. नाट्यप्रयोगांना 12 डिसेंबरला सुरुवात होत असली तरी याच महिन्याअखेरीस हृदयनाथ मंगेशकर यांचा अक्षयगाणी-अभंगगाणी हा पहिला जाहीर कार्यक्रम सादर होणार आहे. लॉकडाऊननंतरच्या या नाट्यप्रयोगांसाठी प्रेक्षकांना खेचण्यासाठी काही नवनव्या कल्पनाही पुण्यात राबवण्याबाबत विचारविनिमय चालू आहे. नाट्यकलेला पुन्हा एकगा गती यावी म्हणून पुण्यातल्या सुदर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे रंगमंच या दोघांनीही प्रायोगिक प्रयोगांसाठीचं भाडं माफ केलं आहे. त्यामुळे आता इथे प्रयोग करायचा असेल तर केवळ ध्वनि यंत्रणा आणि प्रकाश योजनेचं भाडं द्यावं लागेल.


पृथ्वी थिएटरमध्येही नाट्यप्रयोगांचा जागर


प्रायोगिक नाटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्येही नाट्यप्रयोगांना सुरुवात झाली आहे. यापूर्वी तिथे शिबिरांना सुरुवात झाली आहेच. पण आता 26 डिसेंबरपासून नसिरुद्दीन शाह यांची मुख्य भूमिका असलेल्या आईन्स्टाईन या नाटकाचे तिथे सहा प्रयोग होणार आहेत. तर मकरंद देशपांडे यांच्या गांधी आणि एपिक गडबड या नाटकांचे प्रयोगही तिथे होणर आहेत. सायंकाळी 5 आणि रात्री 9 वाजता हे नाट्यप्रयोग होतील.


महत्त्वाच्या बातम्या :