मुंबई : सिनेसृष्टी नामक या चंदेरी दुनियेचं सर्वांनाच आकर्षण असतं. इथल्या रूपेरी पडद्याच्या माध्यमातून आपली एक झलक जगासमोर यावी यासाठी असंख्य कलाकार आपलं आयुष्य खर्ची घालतात. याकरिता इथल्या वातावरणाला पोषक वाटावं असं एखादं ग्लॅमरस नाव धारण करून आपली कारकिर्द सुरू करतात, पण काही कलाकार मात्र आपल्या नावाचा सार्थ अभिमान बाळगत त्याच नावानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरतात. अशाच कलाकारांपैकी एक असलेला मराठमोळा अभिनेता भाऊसाहेब शिंदे.


भाऊसाहेब आता ‘लागलं याड तुझं’ या आगामी मराठी सिनेमात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बाजी मारून गेलेल्या ‘ख्वाडा’ या मराठी सिनेमात भाऊसाहेबने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘बबन’ या प्रेमकथेद्वारे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेला भाऊसाहेब शिंदे ‘लागलं याड तुझं’ या आगामी सिनेमात प्रेमाचे नवे रंग उधळताना दिसणार आहे. निर्माते रूपेश दिनकर पगारे, संजय बाबुराव पगारे आणि अरविंद अर्जुन कदम “शकुंतला क्रिएशन्स’’च्या बॅनरखाली ‘लागलं याड तुझं’ या सिनेमाची निर्मिती करीत असून “जिजाऊ क्रिएशन्स’’च्या रूपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या सिनेमाची निर्मिती व्यवस्था सांभाळत आहेत. आकाश अर्जुन कदम हा नवा चेहरा ‘लागलं याड तुझं’च्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठी सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात “शुकंतला क्रिएशन्स’’चं हे पहिलं पाऊल असून, ‘लागलं याड तुझं’ या प्रेमकथेच्या रूपात नाविन्यपूर्ण, रोमांचक आणि संगीतप्रधान सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. आजवर मराठी सिनेमात कधीही न दाखवण्यात आलेले प्रेमकथेतील दुर्लक्षित पैलू हा सिनेमा रसिकांसमोर उलगडणार असून दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सुसज्ज ‘लागलं याड तुझं’ सर्वांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांकडून व्यक्त केला जात आहे.


नाव बदलल्यानं नशीब बदलत नसतं, तर मेहनत घेतल्यानं नक्कीच बदलू शकतं हा विचार भाऊसाहेब शिंदेनं सर्वांर्थानं सार्थ ठरवला आहे. मनात प्रबळ इच्छाशक्ती घेऊन महाराष्ट्रातील एका खेडेगावातून शहरात आलेल्या भाऊसाहेबानं आपल्या मित्र-मंडळींच्या साथीनं चंदेरी दुनियेत पहिलं पाऊल टाकलं. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमामुळं अल्पावधीत प्रकाशझोतात आल्यानंतर भाऊसाहेबचा खरा स्ट्रगल सुरू झाला. ‘बबन’च्या लोकप्रियतेनंतर आता ‘लागलं याड तुझं’ हा सिनेमा ख-या अर्थानं भाऊसाहेबसाठी पुढचा मार्ग मोकळा करून देणारा ठरणार आहे. नुकताच ठाणे येथे सिनेसृष्टीतील मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. ‘लागलं याड तुझं’ या शीर्षकावरून सिनेमाच्या कथानकाची थोडीफार कल्पना येत असली तरी सिनेमात काहीसं रोमांचक कथानक पहायला मिळणार आहे. या सिनेमाची संकल्पना संतोष दाभोळकर यांची आहे. नुकतीच निर्मितीसंस्थेच्या वतीनं या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून काही महत्त्वाच्या बाबी सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्या आहेत.