मुंबई : राज्य सरकारने आजपासून सिनेनाट्यगृहे अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या नियमांचे पालन करत आजपासून राज्यात सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू झाली आहेत. आजपासून रंगभूमीचा पडदा उघडला गेला आहे. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामलेंच्या गाजलेल्या नाटकाने आज रंगभूमीचा पडदा उघडला आहे. तर मागील सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृहांनादेखील आज हिरवा कंदील मिळाला आहे. 


आज सिनेमागृहे सुरू होताच फर्स्ट डे फर्स्ट शो पासूनच मुंबईकर तिकीट घरासमोर पाहायला मिळाले आहेत. सात महिन्यांपासून सिनेमाप्रेमी मोबाईल ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा आनंद घेत होते. आता सिनेमागृहे सुरू झाल्याने सिनेमागृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी पहिल्या शो पासून तिकीट खिडक्यांवर प्रेक्षक बुकिंग करताना दिसून आले. सिनेमागृह सुरू झाल्यानंतर बॉलीवूडमधील सिनेमा नसल्याने हॉलिवूडच्या चित्रपटांना सिनेरसिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. यात मोठ्या प्रमाणात तरुणाई चित्रपटगृहांकडे जाताना दिसून आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरात मोबाईल किंवा टीव्हीवर चित्रपट बघून कंटाळलेली तरुणाई आपल्या मित्रमंडळींसोबत पुन्हा एकदा चित्रपट गृहातला अनुभव घेण्यासाठी आले होते. 


गेल्या पावणेदोन वर्षांत मराठी रंगभूमीवरील पडद्यामागचे कलावंत, तंत्रज्ञ यांच्यावर वाईट दिवस आले होते. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी मदत केली होती. आजपासून सिने-नाट्यगृहे सुरू होत असल्याने अनेक बड्या कलाकारांपासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत सगळेच खूश आहेत. प्रेक्षकदेखील गेले अनेक दिवस ओटीटी, टीव्ही माध्यमातील कार्यक्रम बघून कंटाळले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांना दर्जेदार कंटेंटचा आस्वाद घेता येणार आहे. 


आज रंगभूमीचा पडदा उघडताच मराठी नाटकाचा पहिला प्रयोग रंगला आहे. आज वांद्रेच्या पश्चिम रंगशारदा नाट्यमंदिरात प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या गाजलेल्या नाटकाचा एक खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. या प्रयोगाची संकल्पना भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची आहे. प्रयोगादरम्यान शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगाची खासियत म्हणजे 50 टक्के क्षमतेने रसिकांना विनामूल्य प्रयोग पाहता येणार आहे. रेड कार्पेट अंथरूण व गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे. 


Theatre Reopen : नाटक होणार पण निर्बंधांचं काय? कलाकार आणि दिग्दर्शक म्हणतात...


अनलॉकनंतर अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली होती. पण नाट्यगृहाचा पडदा उघडण्यास ठाकरे सरकारने मज्जाव केला होता. त्यानंतर अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलने केली होती. पण त्यातही ही मंडळी यशस्वी झाली नव्हती. पण आता मात्र या कलावंतांच्या लढ्यात सहभागी होत भाजप नेते आशिष शेलार यांनी समारंभापूर्वक 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे. 


सध्या रंगभूमीवर सुरू असलेली मराठी नाटकं


'एका लग्नाची पुढची गोष्ट'
23 ऑक्टो. दु. 4.30 डोंबिवली
24 ऑक्टो. दु. 1 कोथरुड
24 ऑक्टो. सं. 5.30 बालगंधर्व
30 ऑक्टो. दु. 4 बोरिवली
31 ऑक्टो. दु. 4 दिनानाथ


'तू म्हणशील तसं'
23 ऑक्टो. दु. 4.30 बोरिवली 
24 ऑक्टो. दु. 4.30 ठाणे (काशीनाथ घाणेकर नाट्यगृह)


अलबत्या गलबत्या, व्हॅक्यूम क्लीनर, सही रे सही, चंद्रकांत कुलकर्णींचे नवं कोरं नाटक दिवाळीच्या शुभमुहुर्तावर नाट्य रसिकांच्या भेटीला येणार आहे. 


सिनेमागृहात प्रदर्शित होणारे आगामी मराठी सिनेमे
जयंती - 12 नोव्हेंबर
झिम्मा - 19  नोव्हेंबर
गोदावरी - 3 डिसेंबर
डार्लिंग - 10 डिसेंबर
फ्री हिट दणका - 17 डिसेंबर
दे धक्का 2 - 1 जानेवारी


गडकरी रंगायताला दिवाळीपर्यंत टाळेच!