Tu mhanshil tasa marathi drama : सिनेमागृहे आणि नाट्यगृहांना परवानगी मिळाल्यापासून निर्माते त्यांच्या नाटकाच्या किंवा सिनेमाच्या तारखा जाहीर करु लागले आहेत. अशातच 'तू म्हणशील तसं' हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालं आहे. दसऱ्याला या नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 23 ऑक्टोबर शनिवारी साडेचार वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात  'तू म्हणशील तसं' नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. तर 24 ऑक्टोबरला दुपारी 4:30 वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात याच नाटकाचा दुसरा प्रयोग रंगेल. 


'तू म्हणशील तसं' या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई प्रमुख भूमिकेत आहेत. तर अमोल कुलकर्णी, प्रिया करमरकर या कलाकारांचादेखील समावेश आहे. या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडेनेच केले आहे. तर प्रसाद ओकने दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचे नैपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केले आहे. तर अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन, गौरी थिएटर्स यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. नाट्यगृहे बंद असल्याने प्रेक्षकांना चांगल्या दर्जाची नाटकं पाहता येत नव्हती. पण आता रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. 


संकर्षण कऱ्हाडेने सोडली मालिका
संकर्षण कऱ्हाडे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत समीर नावाचे पात्र साकारत होता. त्याच्या त्या पात्राला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत होते. मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे आणि मालिकेतील परी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पण नाट्यगृहांचा पडदा आता पुन्हा उघडणार असल्याने संकर्षण मालिका सोडणार आहे. अशा चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. संकर्षणचे 'तू म्हणशील तसं' नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. 


एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचे रंगणार प्रयोग 
22 ऑक्टोबर रोजी रंगभूमीचा पडदा उघडणार आहे. त्यानिमित्ताने मराठी नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी वांद्रेच्या पश्चिम रंगशारदा नाट्यमंदिरात प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या गाजलेल्या नाटकाचा एक खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. या प्रयोगाची संकल्पना भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची आहे. प्रयोगादरम्यान शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगाची खासियत म्हणजे 50 टक्के क्षमतेने रसिकांना विनामूल्य प्रयोग पाहता येणार आहे. रेड कार्पेट अंथरूण व गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे.