अहिल्यानगर: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ‘अहिल्यानगर महाकरंडक 2025’ ही एकांकिका स्पर्धा येत्या 16 ते 19 जानेवारी या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात संपन्न होत आहे. गेल्या 11 वर्षांपासून 'अहमदनगर महाकरंडक' नावाने प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे बदलल्याने आता 'अहिल्यानगर महाकरंडक' नावाने ओळखली जाणार आहे. यंदाचं स्पर्धेचं हे 12वे वर्ष आहे. मागील एका तपात ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठी मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून नाट्य वर्तुळात ओळख निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 351 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं 'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' हे ब्रीदवाक्य आहे.


अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित व आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर आहेत. रंगकर्मींच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या 'अहिल्यानगर महाकरंडक' एकांकिका स्पर्धा 2025 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाली आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून 'अहिल्यानगर महाकरंडक' 2025 स्पर्धेत आपली भूमिका बजावत आहे.  


या स्पर्धेने अनेक गुणी कलावंतांना व्यासपीठ दिले आहे. या मांडवाखालून गेलेल्या अनेक कलावंतांनी मालिका चित्रपट आणि ओटीटी माध्यमात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून 'अहिल्यानगर महाकरंडक'ने एकांकिका विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेचा रंगमंच गाजवण्यासाठी राज्यभरातील कलावंतांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात यंदाची स्पर्धा रंगेल असा विश्वास 'अहिल्यानगर महाकरंडक' समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिला. एकांकिकांना स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपातील दमदार बक्षीस देऊन महाराष्ट्रातील नाट्य चळवळीला पाठबळ देण्याची भरीव कामगिरी  नरेंद्र फिरोदिया हे गेले दशकभर सातत्याने करत आहेत.


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या बोधचिन्हाची अर्थातच 'महासंस्कृती' ची मोहोर 2022 साली अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेवर उमटली. आत्तापर्यंत स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील महेश मांजरेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. तर केदार शिंदे,  सुजय डहाके, विजय पाटकर, किरण यज्ञोपवित, विकास कदम, प्रवीण तरडे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, स्व. अतुल परचुरे, संजय मोने, श्वेता शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे.


स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ₹ 1,51,111/- रुपये रोख, अहिल्यानगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक मिळणार आहे. तसेच विक्रमी रकमेची सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे देखील असणार आहेत. महाराष्ट्रातील एकांकिकांसाठी इतक्या मोठ्या रकमेची आकर्षक पारितोषिके देणाऱ्या निवडक स्पर्धांमधील प्रमुख स्पर्धा म्हणून 'अहिल्यानगर  महाकरंडक' स्पर्धेने स्वतःचा नावलौकिक गेल्या दशकभरात कमावला आहे.


इतर बातम्या : 


दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही