मुंबई :  कोरोनाची दुसरी लाट वाढताना दिसत असतानाच आता टीव्ही इंडस्ट्रीनेही हा कोव्हिड थांबावा म्हणून कंबर कसली आहे. एकिकडे आरटीपीसीआर, अँटीजन टेस्ट ठराविक काळाने करण्याचा निर्णय फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलने घेतला आहेच. पण त्याही पलिकडे सेटवर घ्याव्या लागणाऱ्या काळजीसाठी सर्वच चॅनल्सनी विशेष तरतूद केली आहे. या वाढीव खर्चाची रक्कम दर महिन्याला सव्वा लाखाच्या घरात जाते. 


कोणत्याही मालिकेच्या निर्मितीसाठी चॅनल निर्मात्याला दर एपिसोडचे ठरलेले पैसे देत असते. त्या बदल्यात निर्माता त्या बजेटमध्ये मालिकेचा एपिसोड बसवत असतो. यात कलाकारांचं मानधन, तंत्रज्ञांचं मानधन, कॅमेरा, सेटिंग, खानपान आदींचा समावेश होतो. त्यात आता कोव्हिड आल्यापासून आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती आहे सेटवर कोव्हिडला रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांची. यासाठी खर्चही असतो. सेटवरच्या डॉक्टरची फी, सेटवरच्या प्रत्येकाला लागणारे मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर्स, सॅनिटायझर फवारणारी मंडळी, टेम्प्रेचर चेक गन, हॅंडग्लोव्हज, डस्टबीन्स आदीचा समावेश होतो. याचा खर्च वाटतो त्यापेक्षा बराच आहे. मालिकांच्या सेटवर कोव्हिडची काळजी घेतली जावी म्हणून वाढीव तरतूद निर्माते-चॅनल्सना करावी लागते. मराठीसाठी हा आकडा दर महिन्याला दीड ते दोन लाखांवर जातो. तर हिंदीमध्ये हा खर्च साडेतीन ते चार लाखांच्या घरात जातो. 


या खर्चाबद्दल बोलताना दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी खूप छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सॅनिटायझर्स, फेसशिल्ड, मास्क हे तर आहेतच. पण सेटवरची स्वच्छतागृहं दर दोन तासांनी स्वच्छ करावी लागतात. त्याच्या सोल्युशनचा खर्च.. सफाई कर्मचाऱ्याचा खर्च आहे. शिवाय, हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, कॉश्च्युम स्टायलिस्ट हे कलाकारांच्या जवळ जातात. त्यांच्यासाठी आम्ही पीपीई किट वापरतो. त्याचाही खर्च असतो. मराठीमध्ये सर्वसाधारणपणे 50 ते 75 जणांचं युनिट असतं. त्याचा खर्च दीड ते दोन लाखांवर जातो. हिंदीत हाच खर्च साडेतीन चार लाखांवर जातो. कारण त्यांचं युनिट मोठं असतं. इतरांबद्दल मला कल्पना नाही. पण सोनी आणि स्टार या खर्चाबाबत पूर्ण सहकार्य करत आहेत


दररोज लागतात किमान इतक्या गोष्टी..



  • सॅनिटायझर - किमान 10 लीटर 

  • मास्क - 150

  • पीपीई किट्स - 10

  •  फेसशिल्ड्स - 15


निर्माते यासाठी करतात खर्च..



  • सॅनिटायझर फवारणी

  • मास्क

  •  फेसशिल्ड

  •  पीपीई किट

  • स्वच्छतागृहांची स्वच्छता

  • डॉक्टर

  • आरटीपीसीआर टेस्ट

  •  संसर्ग टाळण्यासाठी विषेश वाहतूक व्यवस्था

  •  तंत्रज्ञ कलाकारांसाठी निवास व्यवस्था