Kokan Film Festival : कोकण म्हटलं की, आपल्या डोळयासमोर उभं राहतं ते तिथलं विलोभनीय निसर्गसौंदर्य. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगराळ भाग हे पर्यटनाचे आकर्षण आहे. कोकणाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती आणि उत्कृष्ट कलाकार कोकणाने चित्रपटसृष्टीला दिले आहेत. कोकणातील या सांस्कृतिक प्रतिभेचा अधिकाधिक विस्तार व तिथल्या गुणी कलाकारांना वाव मिळावा यासाठी ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 ते 14 मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे (Kokan Film Festival) आयोजन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, निशा परुळेकर, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि मंडळीनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
मराठी चित्रपटांचा सन्मान!
या महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक 10 मराठी चित्रपट दाखवण्यात येतील. प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांना मानांकन देऊन, त्यांना सन्मानित करण्यात येणार असून, सर्वोत्कृष्ट कलाकार, तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच, आतापर्यंत चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कोकणातील सिंधुरत्नांचा गौरव यावेळी केला जाईल.
सहभागी होण्यासाठी नियम व अटी
स्पर्धेसाठी 2019 ते 2021 या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. चित्रपट निर्मीती संस्थांनी kokanchitrapatmahotsav.com या वेबसाइटवर आपले अर्ज सादर करायचे आहेत. 1 एप्रिलपासून यासाठी प्रवेशअर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे. या महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी रुपये 1000/-(रुपये एक हजार) प्रवेशिका फी आकारण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या चित्रपट संस्थानी आपले चित्रपट mov फॉरमॅटमध्ये पेनड्राइव्हवर आणून देणे बंधनकारक आहे.
स्थानिक कलाकारांना संधी मिळवून देण्याचा उद्देश!
या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहचवण्यासोबत, इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले. या मंचाच्या माध्यमातून पुढील काळात कोकणात जास्तीत जास्त चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून येथील पर्यटन वाढण्यासाठी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून चालना मिळेल व त्यातून स्थानिक कलाकारांना संधी, रोजगार उपलब्ध होईल.
हेही वाचा :
- Oscars 2022 : ‘ऑस्कर’ला लता मंगेशकर आणि दिलीपकुमारांचा पडला विसर? संतप्त चाहते म्हणतात...
- The Kashmir Files Collection : बॉक्स ऑफिसवर ‘द कश्मीर फाइल्स’ची जादू कायम, तिसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतका’ गल्ला!
- Sher Shivraj New Poster : ‘जावळीच्या जंगलाचा राजा एकच...!’, ‘शेर शिवराज’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला