Thalaivi Trailer | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपली छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कंनगना रनौत हिच्या अभिनयाची आणखी एक दमदार झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एका कार्यक्रमात खुद्द कंगनानंच तिच्या आगामी 'थलैवी' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 


विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्तानं देशाच्या राजकीय पटलावर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दक्षिण भारतातील राजकीय गणितांचा अंदाज येणार आहे. शिवाय तेथील कलाविश्वाची गणितं, कलाकारांचं जगणं या साऱ्यावरही चित्रपटाच्या निमित्तानं प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 


एमजीआर, जयललिता ही नावं दाक्षिणात्य राजकारणात प्रचंड लोकप्रिय. या नावांमागे, त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामागे नेमका कसा प्रवास होता, ही मंडळी नेमकी कशी घडली आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची परिस्थिती कारणीभूत ठरली याचीच झलक थलैवीच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.


Happy Birthday Kangana Ranaut | कंगना रनौत... फॅशन ते मणिकर्णिका चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री 


अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या जे. जयललिता यांचा थेट मुख्यमंत्री आणि देशाच्या राजकाराणातील महत्त्वाचं व्यक्तिमत्त्वं होण्यापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासात आलेली महत्त्वाची वळणं हे सारंकाही या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. कंगनाच्या अभिनयाची झलक पाहता, ही क्वीन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार असं म्हणायला हरकत नाही. 



विजय दिग्दर्शित हा चित्रपट 23 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या नावे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला. तेव्हा आता प्रेक्षकांची तिच्या या कलाकृतीला कितपत पसंती मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


दरम्यान, सोमवारी कंगनाच्या नावे 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या चित्रपटातील तिच्या भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत कंगनाने चौथ्यांदा मजल मारली आहे. त्यामुळं बी- टाऊनच्या या क्वीनचं नाणं खणखणीत वाजलं आहे, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निमित्तानं 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर विविध विभागातील पुरस्कार विजेत्यांची यादी सोमवारी घोषित करण्यात आली.