Yuzvendra Chahal At Bigg Boss 18: भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याची पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अद्याप, या जोडप्यानं घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांमध्येच आता युजवेंद्र चहल सलमान खानच्या 'बिग बॉस 18' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. नुकताच तो सलमान खान होस्ट करत असलेला शो 'बिग बॉस 18' च्या सेटवर दिसून आला.
'बिग बॉस 18' च्या सेटवर युजवेंद्र चहल कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्यानं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाची सॅल डेनिम पँट वेअर केली होती. चहलनं पिवळ्या रंगाच्या स्नीकर्ससोबत त्याचा संपूर्ण लूक पूर्ण केला होता. यादरम्यान त्याच्या हातात एक बॅकपॅकही दिसली. तो त्याच्या गाडीतून खाली उतरला आणि थेट त्याच्या व्हॅनिटी व्हॅनकडे गेला. यादरम्यान, चहलनं पापाराझींसाठी पोझ देणंही कटाक्षानं टाळलं.
चहलनं श्रेयस अय्यर, शशांक सिंहसोबत काढले फोटो
व्हॅनिटी व्हॅनमधून तयारी करून काही वेळातच युझी बाहेर आला. यादरम्यान त्याच्यासोबत श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह देखील दिसले. युझीनं काळा टी-शर्ट, कार्गो आणि पांढऱ्या रंगाचं जॅकेट वेअर केलं होतं. त्यावेळी मात्र युझी पापाराझींसाठी पोज देतानाही दिसला.
घटस्फोटाच्या चर्चांवर चहल काय म्हणाला?
धनश्री वर्मा आणि युझी चहल यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तेव्हापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला आहे. त्याच वेळी, धनश्री आणि युझी यांच्यातील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्याही समोर येत आहेत. या जोडप्यानं या अफवांवर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही, पण युझी चहलनं अलिकडेच एक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये, चहलनं अफवांबद्दल वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला की, त्या अफवा खऱ्याही असू शकतात किंवा नसूही शकतात.
धनश्रीनंही केलेलं 'हे' वक्तव्य
यापूर्वी, धनश्रीनंही इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात तिनं वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीनं स्वतःचं नाव कमावलं आहे, असं म्हटलं होतं. धनश्रीनं असा दावा केलेला की, लोक निराधार अफवा पसरवून तिचं चारित्र्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.