Tujhech Mi Geet Gaat Aahe : स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का?, याची उत्सुकता असतानाच आता मालिकेत ‘रंजना’ या नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात रंजना हे पात्र साकारत असून मालिकेत तिचे स्वरासोबतचे खास सीन पाहायला मिळणार आहेत. रंजना हे पात्र खूपच वेगळं आहे. रंजना एक छोटीशी खानावळ चालवत असते. वडिलांचा शोध घेत असलेल्या स्वरासोबत तिची भेट होते आणि काही काळासाठी ती तिला आपल्या खानावळीत आसरा देते.


या पात्राची विशेष गोष्ट म्हणजे रंजना हे पात्र मालवणी भाषेत बोलतं. अभिनेत्री वनिता खरातसाठी मालवणी भाषेत बोलणं आव्हानात्मक होतं. मात्र, सहकलाकारांच्या मदतीने मालवणी भाषेचा गोडवा जपत तिने हे पात्र खुलवलं आहे. रंजनाचा स्वभाव थोडासा रागीष्ट आहे. मात्र, स्वराची पार्श्वभूमी कळल्यावर ती खूप प्रेमाने तिला जवळ करते. मालिकेत हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


वानिताशी जमली खास गट्टी!


पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत वनिताची खास गट्टी जमली आहे. इतक्या लहान वयात तिला असणारी समज पाहून थक्क व्हायला होतं. स्वरा साकारण्यासाठी अवनीने नागपूरी भाषा आत्मसात केली आहे. अतिशय गोड आणि हुशार अश्या स्वरासोबत काम करताना अतिशय मजा आली, अशी भावना वनिताने व्यक्त केली.


काय आहे मालिकेचं कथानक?


गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली ‘स्वरा’ आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे असा सुप्रसिद्ध गायक ‘मल्हार’ यांचा सांगितिक प्रवास या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. गाणं हा या मालिकेचा मूळ गाभा आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी एक दोन नाही, तर आत्तापर्यंत तब्बल 18 गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी यात सामील होणार आहेत. त्यामुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे.


हेही वाचा: