Comedian Parag Kansara : टीव्ही विश्वातील लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून लोक सावरलेही नाहीत, तर आता ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये झळकलेल्या कॉमेडियन पराग कंसारा (Comedian Parag Kansara) यांचेही आकस्मिक निधन झाले आहे. पराग कंसारा यांच्या निधनानंतर संपूर्ण कॉमेडीविश्व पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी पराग यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
कॉमेडियन-अभिनेते सुनील पाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करून पराग यांच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, कॉमेडीच्या दुनियेतून आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आमच्या लाफ्टर चॅलेंजचे सहावे पार्टनर पराग कंसाराजी आता या जगात नाहीत. प्रत्येक गोष्टीचा उलट विचार करून, ते आम्हाला खूप हसवायचे. पण, पराग भाई आता या जगात नाहीत. हे काय सुरु आहे?’
पाहा व्हिडीओ :
आपल्या या व्हिडीओमध्ये सुनील म्हणाले की, कॉमेडीच्या या जगातला कुणाची नजर लागलीये हे कळत नाही. सगळ्यांना हसवणार्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अशी स्थिती का होत आहे. एकापेक्षा एक विनोदी कलाकार आपल्यापासून दूर जात आहेत. काही दिवसांपूर्वी आपण राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप दिला. त्याचा धक्का अजूनही आहे. अजूनही आमचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या आधी भाबीजी घर पर हैं या मालिकेतील दिपेश भानने लहान वयात चाहत्यांना अलविदा म्हटले. चार दिवसांपूर्वीच माझा चांगला मित्र आणि कॉमेडियन जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी हास्यकवी अशोक सुंदराणी यांचे निधन झाले, अनंत श्रीजी यांचेही निधन झाले आणि आता पराग कंसारा.
पराग कंसारा यांची ओळख
कॉमेडियन पराग कंसारा (Parag Kansara) हे गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी होते. त्यांनी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या लोकप्रिय कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधून ते घराघरांत लोकप्रिय झाले होते. त्यांची कॉमेडी चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र, ते या शोचे विजेतेपद पटकावू शकले नाहीत. या शोनंतरही पराग कंसारा यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले होते. परागचे शो फक्त टीव्हीवरच नाही, तर इतर ठिकाणीही पसंत केले गेले होते.
हेही वाचा :