Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिकेने बाजी मारली आहे. आता या मालिकेचे 200 भाग पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने या मालिकेच्या टीमने मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात (Siddhivinayak Ganapati Mandir) जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.


'ठरलं तर मग' या मालिकेच्या टीमने मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन आणि शुभाशिर्वाद घेतले आहे. सिद्धिविनायकाच्या मंदिरातील 'ठरलं तर मग' या मालिकेच्या टीमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सायली आणि अर्जुनदेखील बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत.


'ठरलं तर मग' या मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर आणि आदेश बांदेकर आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेच्या टीमसह त्यांनीदेखईल बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला. 






'ठरलं तर मग' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे. याच प्रेमापोटी सातत्याने नंबर वन रहाण्याचा मान 'ठरलं तर मग' मालिकेला मिळाला आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम आणि बाप्पाचा आशीर्वाद असाच पुढच्या प्रवासात मिळावा ही भावना संपूर्ण टीमने या खास प्रसंगी व्यक्त केली.


'ठरलं तर मग' या मालिकेत जुई गडकरी (Jui Gadkari) आणि अमित भानुशाली (Amit Bhanushali) मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून जुईने अनेक महिन्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तर अमित भानुशालीने तब्बल नऊ वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे. अमित आणि जुईचा सध्या मालिका विश्वात बोलबाला आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेत जुईने सायली तर अमितने अर्जुनची भूमिका साकारली आहे. 


'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर


'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेचं कथानक आणि सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टीआरपी रिपोर्टनुसार, 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात काय रंजक वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


Marathi Serial : 'ठरलं तर मग' मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर