Tharla Tar Mag Amit Bhanushali : सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ठरलं तर मग (Tharla Tar Mag) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सुरुवातीपासूनच ही मालिका टीआरपीच्या देखील शर्यतीत अव्वल स्थानी आहे. नुकतेच या मालिकेचे 400 भाग पूर्ण झालेत. पण सोशल मीडियावर सध्या एक वेगळीच चर्चा आहे. या मालिकेत मुख्य पात्र अर्जुनची भूमिका निभावत असलेल्या अमित भानुषालीच्या (Amit Bhanushali) नावाने पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. 


अमितने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरुन या गोष्टीबाबात स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच माझा या गोष्टीशी काहीही संबंध नसल्याचं अमितने यावेळी सांगितलं आहे. तसेच त्याने या अकाऊंटवरुन कोणत्याही प्रकारेच पैसे न देण्याचे आवाहन केले आहे. 


नेमकं प्रकरण काय?


अमित भानुषालीच्या नावाने एक फॅनपेज आहे. त्या फॅनपेजवरुन पैशांची मागणी करण्यात आलीये. एक क्युआर कोड इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवून पैसे पाठव गरज आहे आणि डोनेट पम करायचेत असा मेसेज ठेवण्यात आलाय. ही स्टोरी अमितने त्याच्या ऑफीशिअल अकाऊंटवरुन रिपोस्ट केलीये. त्याने म्हटलं की मला या डोनेशबद्दल काही माहित नाही. कृपया कोणीही पैसे पाठवू नका, असं अमितने म्हटलं आहे. 


ठरलं तर मालिकेचे 400 भाग पूर्ण


अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्या 'ठरलं तर मग' या मालिकेने नुकताच 400 भागांचा टप्पा पार केला आहे. स्टार प्रवाहवरील ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत सध्या चैतन्यने अर्जुनची साथ सोडली असून तो आता वकील रविराज किल्लेदार यांच्यासोबत काम करणार आहे. दुसरीकडे अर्जुनचे वडील प्रताप यांना पोलिसांनी ड्रग्सची तस्करी केल्याच्या आरोपाअंतर्गत अटक केली आहे. मालिकेत या गोष्टी घडत असल्या तरी कथानक खूप पुढे जात नसल्याची तक्रार प्रेक्षकांकडून होत आहे.


'ठरलं तर मग'चे प्रेक्षक नाराज


'ठरलं तर मग' या मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केला आहे. पण या मालिकेचे प्रेक्षक मात्र कथानकावरुन नाराज आहेत. 400 वा भाग चांगला झाला, मालिका आणखी रंजक करायला हवी, गेले काही दिवस मालिका खूप कंटाळवाणी वाटत आहे. आता मालिकेत नवा ट्विस्ट यायला हवा, कथानक पुढे सरकत नसल्याने मालिका पाहिला कंटाळा येतो, तोच तोच पणा आल्याने मालिका पाहायचा कंटाळा येतोय, अशा कमेंट्स करत मालिकाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. 


ही बातमी वाचा : 


Tharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या 'ठरलं तर मग'चे 400 भाग पूर्ण; कथानक पुढे सरकत नसल्याने कंटाळले प्रेक्षक