TMKOC Actress Jennifer Mistry Bansiwal : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री जेनिफरवर (Jennifer Mistry Bansiwal) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मागील बऱ्याच काळापासून तिची बहिण आरोग्याच्या समस्येने ग्रस्त होती. तसेच त्यानंतर आता तिने 13 एप्रिल रोजी शेवटचा श्वास घेतला असल्याचं यावेळी जेनिफरने सांगितलं आहे. जेनिफरने यावेळी तिच्या बहिणीच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या जेनिफर तिच्या आयुष्यात अनेक कठिण प्रसंगातून जात आहे. त्याचप्रमाणे तिने तारक मेहता या मालिकेचे निर्माते आसितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तसेच तिच्या भावाचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यामुळे मागील काही दिवसांपासून जेनिफरच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणी येत असल्याचं पाहायला मिळतंय.
जेनिफरने पोस्टमध्ये काय म्हटलं?
जेनिफरने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिच्या बहिणीसाठी पोस्ट केली होती. यावेळी तिने त्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझी बहिण डिंपल, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करता येणार नाही. तु आम्हाला आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात आणि चेहऱ्यावर हसू ठेवून कसा जगावा हे शिकवलंस.
मागील दीड वर्ष बेताची - जेनिफर
दरम्यान जेनिफरने काही दिवसांपूर्वी टाईम्ससोबत बोलताना म्हटलं की, मी मागील दीड वर्षांपासून बराच संघर्ष करतेय. माझ्या धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मी माझ्या माहेरच्या सात मुलींचा सांभाळ करत आहे. यावेळी असित मोदी प्रकरण घडले. सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे माझ्यासाठी खूप अवघड होते. त्यामुळे गेले काही महिने माझ्यासाठी त्रासदायक होते. तसेच तारक मेहता ही मालिका सोडल्यानंतर जेनिफरला कोणताही रोल मिळाला नसल्याचं तिनं म्हटलं. पण असं एक प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यांना माझासारख्या पात्राची गरज आहे. ते लोक मला अप्रोच करु शकतात.
काही दिवसांपूर्वी जेनिफरने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते आसितकुमार मोदी यांच्याविरोधातला खटला जिंकला होता. त्या प्रकणात न्यायालयाने आसितकुमार मोदी यांना 5 लाखांचा दंड ठोठावला होता. पण अद्याप त्यांनी जेनिफरला नुकसान भरपाई दिली नसल्याची माहिती समोर आलीये. पण अद्यापही आसितकुमार मोदी किंवा त्यांच्या टीमकडून यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलं नाहीये.