Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अर्थात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. 2008 साली सुरू झालेली ही मालिका वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. पण तरीही या मालिकेची क्रेझ कायम आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या या मालिकेला 15 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद कलाकारांसह प्रेक्षकांनाही झाला आहे. 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केलं आहे. सोशल मीडियावर पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'हसो हसाओ' म्हणत कलाकारांनी सेलिब्रेशन केलं आहे.






'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भागाचं 28 जुलै 2008 रोजी प्रसारण झालं होतं. निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना चांगलच भावलं. आतापर्यंत मालिकेचे 3803 एपिसोड पूर्ण झाले आहेत. 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेचा एक विशेष भाग प्रसारित करण्यात आला आहे. या विशेष भागात मालिकेतील सर्व कलाकार गोकुळधाम सोसायटीमध्ये पावसात धमाल मस्ती करताना दिसून आले. 


गेल्या 15 वर्षांत 'या' कलाकारांचा मालिकेला रामराम


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अनेक कलाकारांनी गेल्या 15 वर्षांत मालिकेला रामराम केला आहे. मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिया अहुजानं मालिका सोडली. सोढीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता गुरूचरण आणि मिसेस रोशनची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर रोशनीनेदेखील मालिकेला रामराम केला. 


सोनूची भूमिका साकारणारी निधी, बावरीची भूमिका साकारणारी मोनिका, अंजलीची भूमिका साकारणीरी नेहा मेहता, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकट, तारक मेहताची भूमिका साकारणारा शैलेश लोढा या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला. तसेच या मालिकेचा महत्त्वाचा भाग असणारी दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी मॅटरनिटी लिव्हनंतर मालिकेत पुन्हा दिसलेली नाही. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. प्रत्येक वयोगटातील मंडळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आवडीने पाहतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल, बबिता जी, अय्यर, भिडे अशा मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. 


संबंधित बातम्या


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मोठ्या पडद्यावर; निर्मात्यांची मोठी घोषणा