Sulochana Latkar : अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज (5 जून) सायंकाळी 5.30 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकतीच 'आई कुठे कय करते' या मालिकेतील अभिनेते  मिलिंद गवळी (Milind Gawali)  यांनी एक पोस्ट शेअर करुन सुलोचना दीदींच्या आठवणींना उजाळा दिला.


मिलिंद गवळी यांनी सुलोचना दीदींसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सुलोचना दीदी, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर. मी खूप भाग्यवान आहे की, मला त्यांच्याबरोबर काही काळ जगता आला, पहिल्यांदा मी सुलोचना  दीदींच्या घरी "देवकी" नावाच्या माझ्या मराठी चित्रपटाचं प्रीमियर च आमंत्रण द्यायला मी आणि माझे मित्र प्रोड्यूसर मयूर शहा गेलो होतो, त्यांनी आमचा आमंत्रण खूप प्रेमाने स्वीकारलं आणि त्या आवर्जून त्या चित्रपट पाहण्या सा व्हायठी आल्या, आणि आम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या, कदाचित त्यांच्याच आशीर्वादामुळे त्या चित्रपटाला 40 पेक्षा जास्त पारितोषिकं मिळाली, "सूर्योदय एक नवी पहाट" नावाच्या चित्रपटाचं निगेटिव्ह कटिंग असो, किंवा मी एक चित्रपट "मोडेन पण वाकणार नाही" नावाचा चित्रपट दिग्दर्शित करत होतो या चित्रपटाचं मुहूर्त असो, किंवा "चिंगी" नावाच्या आमच्या चित्रपटाचा प्रीमियर असो, सुलोचना दीदी वेळात वेळ काढून प्रत्येक वेळेला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हजर राहील्या, त्या आल्या की आमचा कार्यक्रम हा खूप छान आणि मोठा, भव्य झाल्याचं समाधानचं..'






'खूप गोड स्वभाव , आणि नेहमी हसरा असा त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही. आईच वात्सल्य आणि आईचं प्रेम भरभरून असल्याशिवाय का त्यांनी इतकी वर्ष सिनेमासृष्टीमध्ये आईच्या भूमिकेत लोकांच्या मनावर आधी राज्य गाजवलं, आज त्या आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या असंख्य चित्रपटातल्या अविस्मरणीय भूमिका आपल्या पाशी कायमच राहणार आहेत, आणि माझ्यासाठी तर त्यांच्या सानिध्यात घालवलेले अतिशय आनंदाचे अनमोल क्षण माझ्या हृदयात कायम घर करून बसणार आहेत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करायची शक्ती देवो! आणि दीदींच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.' असंही मिलिंद यांनी पोस्टमध्ये लिहिलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sulochana: 'दीदींचा फोन कॉल आता कधीच येणार नाही ही भावना...'; दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सुलोचना दीदींच्या आठवणींना दिला उजाळा