Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं (Sulochana Latkar) रविवारी संध्याकाळी निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईतील दादरमधल्या सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. मराठी आणि हिंदी मिळून त्यांनी 400 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी (5 जून) शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


सुलोचना दीदी यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच नंतर शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. 


एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत सुलोचना दीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दीदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली".






सायंकाळी 5.30 वाजता अंत्यसंस्कार 


सुलोचना दीदी यांचे पार्थिव आज सकाळी 11 ते 4 या वेळेत प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


सुलोचना दीदी यांनी 1943 साली भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासोबत त्यांनी हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 'वहिनीच्या बांगड्या', 'मीठ भाकर', 'धाकटी जाऊ' असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 


संबंधित बातम्या


Sulochana: चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन