Sameer Pranjape : 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवर सध्या नव्या मालिकांचं सत्र सुरु झालं आहे. काही नव्या मालिका वाहिनीवर सुरु झाल्या आहेत, तर काही नव्या मालिका या लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वाहिनीवर लवकरच येड प्रेमाचं लागलं आणि थोडं तुझं थोडं तुझं माझं या नव्या मालिका सुरु होणार आहेत. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thod Tuz Ani Thod Maz) या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे ही नऊ वर्षांनी मालिकाविश्वात परतली आहे. त्यातच आता या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता समीर परांजपे (Sameer Pranjape ) देखील आठ वर्षांनी पुन्हा मालिकेत स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे.
समीर परांजपे हा आठ वर्षांनी गोठ या मालिकेत झळकला होता. त्याच्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरुभरुन प्रेमही दिलं. त्यानंतर तो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर पुन्हा एकदा समीर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेत तो तेजस प्रभूची भूमिका साकारणार आहे.
कशी आहे समीरची भूमिका?
समीर या मालिकेत प्रभू कुटुंबातील एक सदस्य दाखवला आहे. तो तेजस प्रभू हे पात्र साकारणार आहे. या मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णी ही गायत्री प्रभूच्या भूमिकेत आहे. समीर म्हणजेच तेजस प्रभू हा गायत्रीचा दिर दाखवण्यात आला आहे. प्रभू कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे गायत्री प्रभूच्या उत्पन्नावर संपूर्ण घर चालत असतं. त्यामुळे गायत्रीचा नेहमीच घरच्यांना धाक असल्याचं पाहायला मिळतं. पण या सगळ्याला तेजस मात्र नेहमीच विरोध करत आहे. गायत्रीला प्रभूंचं घर विकायचं असतं. पण त्यालाही तेजस नकार देतो. त्यामुळे या मालिकेचं कथानक आता कसं असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
मालिका कधीपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
ही मालिका येत्या 17 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान ही मालिका रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे स्टार प्रवाहवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे.