Sayali Sanjeev: अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. काहे दिया परदेस (Kahe Diya Pardes) या मालिकेमुळे सायलीला विशेष लोकप्रियता मिळाली. सायलीच्या बालपणाबद्दल तसेच तिच्या चित्रपट आणि मालिकांबद्दल जाणून घेऊयात...
एका मुलाखतीमध्ये सायलीनं तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'माझा जन्म धुळ्याचा आहे पण नाशिकमध्ये माझं बालपण गेलं. मी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना कधीच नाटकामध्ये काम केलं नाही. तेव्हा या इंडस्ट्रीसोबत माझा काहीही संबंध नव्हता. मी एक्सिडेंटली या क्षेत्रात आले.'
ऑडिशन्सबाबत सायलीनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'बीए झाल्यानंतर मी एका नाटकाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी मला बक्षीस देखील मिळालं होतं. प्रवीण तरडे त्या स्पर्धेचे परीक्षण होते. त्यांनी मला सांगितलं होतं की, तू ऑडिशन्स दे. मी ऑडिशन देत होते पण मला रिजेक्ट केलं. माझी एक मैत्रीण होती. तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणीनं एकत्र ऑडिशन्स दिल्या होत्या. एकदा मी एका मालिकेच्या शूटिंगला सकाळी 7.30 वाजता जाणार होते. पण रात्री मला फोन करुन सांगण्यात आलं की, तुला चॅलननं रिजेक्ट केलं आहे. तेव्हा माझ्या मैत्रिणीला त्या मालिकेसाठी सिलेक्ट केलं होतं. मी तेव्हा सामान पॅक करुन निघून गेले. ज्या मालिकेसाठी मला रिजेक्ट केलं होतं ती मालिका दोन-तीन महिन्यात बंद पडली. त्यानंतर काहे दिया परदेससाठी मला सिलेक्ट करुन माझ्या त्या मैत्रीणीला रिजेक्ट करण्यात आलं होतं.'
अडनावाबाबत सायली म्हणाली, 'माझ्या हृदयाच्या कायम जवळ असलेली व्यक्ती म्हणजे माझे बाबा. मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचे नाव लावते. जातीमुळे चर्चा होणे, ही गोष्ट मला आवडत नाही. माझ्या बाबांनी मला घडवलं आहे. त्यामुळे मी त्यांचे नाव लावते.'
सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: