Rituraj Singh Died : छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनावर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. 'अनुपमा' (Anupmaa) मालिकेत त्यांनी काम केले होते.   


अनेक टीव्ही मालिकांमध्ये केले काम 


90 च्या दशकात झी टीव्हीवर 'तोल मोल के बोल' हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केले होते. वर्ष 1993 मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो 'बनेगी अपनी बात'ही खूप गाजला. 'हिटलर दीदी', 'ज्योती', 'शपथ', 'अदालत', 'आहट', 'दीया और बाती', वॉरियर हाय', 'लाडो 2' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


रुग्णालयातून घरी परतल्याने मृत्यूने गाठले


ETimes च्या वृत्तानुसार, ऋतुराज यांचा जवळचा मित्र अमित बहल याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऋतुराजच्या अचानक निधनाने धक्का बसला असल्याचे त्याने म्हटले. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांचे निधन झाले असल्याचे अमित बहल याने सांगितले. 






अनुपमा मालिकेतील भूमिकेने मन जिंकले


ऋतुराज सिंह यांनी 'अनुपमा'मधील भूमिकेने मन जिंकले होते. अनुपमा मालिकेतील त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेचे कौतुक करण्यात आले. 'ये रिश्ता क्या कहलाता'मध्येही त्यांनी  भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते अश्रूंच्या डोळ्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.


अनुपमा मालिकेला दुसरा धक्का


ऋतुराज सिंह यांच्या निधनाने अनुपमा मालिकेला दुसरा धक्का बसला आहे. याआधी मालिकेत अनुपमाच्या मित्राची भूमिका साकारणारे नितेश पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले. कार्डिएक अरेस्टने त्यांचे निधन झाले होते. एका चित्रीकरणासाठी नितेश पांडे हे नाशिकमध्ये गेले होते. त्या दरम्यान रात्रीच्या वेळी त्यांचे निधन झाले.