Prasad Oak: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रसादचा गेल्या वर्षी धर्मवीर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील प्रसादच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. प्रसाद हा सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे तो परीक्षण करतो. नुकतीच प्रसादनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
प्रसाद ओकची पोस्ट
प्रसादनं विठ्ठलाच्या मूर्तीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं,"आज अचानक पॅकअपनंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप vanity van मधे आला आणि म्हणाला… “ दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत. त्यांना 5 मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव, त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे 2/3 मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकानी मला फेटा बांधला… दुसऱ्यानी गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्यानी म्हणजे नवनाथ नी. ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली आणि सगळे जाऊ लागले. मी म्हणालो “ एवढ्याच साठी आला होतात ?” त्यावर ते म्हणाले “ हो दादा, वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..” आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले. मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं??? या जिव्हाळ्याचं,या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे.पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे. अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्ती कडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर मधले आमच्यासंगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले-
संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट
तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं
भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!"
प्रसादनं शेअर केलेल्या पोस्टला जितेंद्र जोशीनं कमेंट केली, 'माऊली आणखी जवळ आली' तर मंजिरी ओकनं कमेंट केली, 'जय हरी विठ्ठल'
इतर महत्वाच्या बातम्या: