Pradeep Patwardhan : नसानसात नाटक भिनलेल्या अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यात नाटकाच्या निमित्तानेच एक कोरून राहणारी गोष्ट घडली आहे. ज्या प्रदीप पटवर्धन यांची नाळ मराठी रंगभूमीशी वयाच्या दहाव्या वर्षापासून जुळली त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी नाट्यस्पर्धेचं परीक्षण करण्याचं जे काम केलं तेच त्यांच्या आयुष्यातील नाटकाशी जोडलेलं अखेरचं काम ठरलं. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डसाठी नाटक विभागासाठी प्रदीप पटवर्धन यांनी जबाबदारी पेलली, या विभागातील नामांकन मिळालेल्या नाटकांतून सर्वोत्कृष्ट नाटक निवडत त्यांच्यातील पारखी रंगकर्मीचं दर्शन घडवलं. 9 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप पटवर्धन यांनी काळाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली खरी पण त्याआधी एक रंगकर्मी परीक्षक म्हणून त्यांची भूमिका चोख पार पाडली.
प्रदीप पटवर्धन यांनी नाटकासाठी खूप संघर्ष केला. सुरूवातीच्या काळात व्यावसायिक नाटकांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मोरूची मावशीसाठी तर त्यांनी पायाला भिंगरी बांधली. पण एका अपघातामुळे त्यांना हे नाटक सोडावं लागल होतं.
झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याची घोषणा करण्यात आली तेव्हा नाटक या विभागातील नामांकनांतून योग्य नाटकाची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून झी टॉकीजने प्रदीप पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला. प्रदीप हे जितके कसलेले नाट्यकलावंत होते तितकेच ते नाटकातील हिऱ्यांची पारख करणारे परीक्षकही होते. नाटक कसं पहावं याच मानबिंदू असलेला प्रेक्षकही त्यांच्यात नेहमी सजग असायचा. नाटक हा विषय जरी निघाला की त्यावर किती बोलू आणि किती नको इतके ते नाटकासाठी वेडे होते. त्यांनी सिनेमा हे माध्यम बदलत्या काळानुरूप स्वीकारलं असलं तरी त्याचं पहिलं प्रेम, आस्था, जिव्हाळा हा नाटक हाच होता. मग झी टॉकीजसारख्या वाहिनीसाठी नाटक या विभागातील पुरस्कारांसाठी नाटकाची, रंगकर्मीची निवड करण्याची संधी त्यांच्याकडे आली तेव्हा नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. प्रदीप पटवर्धन यांना झी टॉकीजने झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डसाठी विनोदी नाटकांसाठी नामांकन ते पुरस्कारयोग्य कलाकारांची नावं निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सामावून घेतले. आजवरच्या अनुभवाची सगळी शिदोरी पणाला लावत प्रदीप पटवर्धन यांनी झी टॉकीज या वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या कॉमेडी नाटक या विभागातील पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. प्रदीप यांच्या पारखी नजरेने वेचलेले हे नाट्य हिरे लवकरच झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर गौरवले जाणार आहेत. पण ज्यांची निवड केली त्यांना पुरस्कार घेताना पाहणारे, आनंदाने टाळया वाजवणारे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रदीप पटवर्धन मंचासमोरील गर्दीत नसतील. आयुष्यभर नाटक जगणारा हा अवलिया त्याच्या आयुष्यातील शेवटचं कामही नाटकाचे परीक्षक म्हणून करून गेला, यापेक्षा एखादया क्षेत्रासाठी वाहून जाणं म्हणजे काय असतं याची प्रचिती येईल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Kartik Aaryan, Aashiqui 3: कार्तिक आर्यनला लागली मोठी लॉटरी! ‘आशिकी 3’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत