Kartik Aaryan, Aashiqui 3: सध्या कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरु आहे. त्याचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. यानंतर त्याच्याकडे एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. सध्या कार्तिक अभिनेत्री क्रिती सेननसोबत 'शहजादा' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे त्याने कियारा अडवाणीसोबत 'सत्यप्रेम की कथा'चे (SatyaPrem Ki Katha) शूटिंग सुरू केले आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. मात्र, आता आणखी एक बिग बजेट चित्रपट कार्तिकच्या हाती आला आहे. कार्तिक आर्यन ‘आशिक 3’ (Aashiqui 3) या चित्रपटात झळकणार आहे.
कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'आशिकी 3’ चे शीर्षक दाखवण्यात आले आहे आणि अरिजित सिंहच्या आवाजात 'तेरे बिन जी लेंगे हम जहर जिंदगी का पी लेंगे हम' हे गाणे ऐकू येत आहे. अर्थात अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच अनुराग बसूसोबत काम करणार आहे. या नवीन भुमिकेसाठी तो खूप उत्सुक दिसत आहेत.
पाहा पोस्ट :
कार्तिक आर्यन 'आशिकी 3' या हिट फ्रँचायझी चित्रपटाचा भाग असणार आहे. 'आशिकी' आणि 'आशिकी 2' हे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले असून, आता 'आशिकी 3'ची तयारी सुरू झाली आहे. ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटात अभिनेत्री कोण असणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ‘आशिकी 3’चे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत.
‘आशिकी’ची हिट फ्रँचायझी
1990 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिकी’ हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर दोघेही रातोरात प्रसिद्ध झाले. यानंतर 2013 मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी 2’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
सध्या कार्तिक आर्यन अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहेत.
संबंधित बातम्या