Nilesh Sable New Comedy Show : छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिकांचा आणि कार्यक्रमांचा सिलसिला सुरु आहे. त्यातच अनेक कार्यक्रम आणि जुन्या मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेतायत. काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरून 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याआधी या कॉमेडी शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती. डॉ. निलेश साबळेने (Dr. Nilesh Sable) शो सोडल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यानंतर निलेश साबळेच्या एका नव्या कार्यक्रमाची घोषणा झाली तेही नव्या वाहिनीवर.
‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडणार आहे. डॉ. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची नवी सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठीवर धावणार आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे, ओमकार भोजने आणि भाऊ कदम ही मंडळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण या मंडळींच्या तारखेत सध्या बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम 20 एप्रिलपासून सुरु होणार होता.
कार्यक्रमाच्या तारखेत बदल
दरम्यान नुकतच कलर्स मराठी वाहिनीकडून या कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कार्यक्रमाची तारीख ही 27 एप्रिल सांगण्यात आली आहे. त्यामुळे 20 एप्रिलपासून प्रदर्शित होणारा हा कार्यक्रम येत्या 27 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे. आता या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय.
नव्या कॉमेडी शोमध्ये कोणते नवे कलाकार?
डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. तर या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये असणार आहेत. हा कार्यक्रम येत्या 27 एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.