मुंबई : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी 4 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी. एकत्र कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे, सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ. असा हा हसता खेळता परिवार 4 ऑक्टोबरपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहच्या कुटुंबासोबत जोडला जाणार आहे.
ठिपक्यांची रांगोळी या नाविन्यपूर्ण शीर्षकाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, 'दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढत बसलेल्या माझ्या मुलीला पाहून मनात विचार आला की कसा एक ठिपका दुसऱ्या ठिपक्यापर्यंत रेष काढून जोडला जातो. बघताना हे सगळे ठिपके स्वतंत्र वेगळे एकमेकांपासून काही अंतरावर असले तरी जोडले गेल्यावर सुरेख नक्षी बनते. या मालिकेचं नाव ठिपक्यांची रांगोळी ठेवण्यामागचं हेच कारण. जोडून राहिलो तर छान सुरेख नक्षी मात्र एक रेष जरी हलली तरी चित्र विस्कटतं. नातेसंबंधांचं देखिल असंच असतं. नाती जोडून ठेवावी लागतात. हात पकडून ठेवावा लागतो, साथ द्यावी लागते, समजून घ्यावं लागतं. एकमेकांपर्यंत पोहोचावं लागतं. नाती कशी सुंदर असतात हे या मालिकेतून दाखवण्यात येईल. रांगोळी दारासमोर असणं हे शुभ असतं. असेच शुभ संकेत घेऊन आम्ही येतोय. ठिपक्यांची रांगोळी घेऊन प्रत्येक घरात रंग भरण्यासाठी.'
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रुपाली गुहा आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची असून गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. तेव्हा स्टार प्रवाहच्या या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी 4 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
महत्त्वाच्या इतर बातम्या :