लहानपणी आपल्याला गुरु द्रोणाचार्यांची आणि एकलव्याची गोष्ट सांगितलेली आठवत असेल. गुरू द्रोणाचार्यांना गुरूस्थानी मानून एकलव्याने तिरंदाजी शिकली. त्यात तो प्रवीण झाला. केवळ द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून त्या पुतळ्यासमोर एकलव्य अविरत कष्ट घेत होता आणि बघता बघता तो अर्जुनापेक्षा चोख तिरंदाज बनला. दंतकथा वाटावी अशी गोष्ट. पण सध्या सुरू असलेल्या इंडियन आयडॉलच्या पर्वात असा एकलव्य दाखल झाला आहे. म्हणजे एरवी तो इंडियन आयडॉलच्या सेटवरच असायचा. पण आता तो अचानक स्पर्धक बनून तमाम तगड्या गायकांना टशन द्यायला सिद्ध झालाय. त्याचं नाव आहे युवराज.
प्रत्येक सेटवर सेटदादा असतात. म्हणजे सेटिंगचं काम करतात. चित्रिकरण सुरू व्हायच्या आधी आणि चित्रिकरण सुरू झाल्यानंतर सेटवर पडलेल्या गोष्टी उचलणे. सेटशी संबंधित काहीही गोष्ट अडली की या सेटदादांना बोलावलं जातं. लाईट्स अॅडजस्ट करणं अशा गोष्टी सेट दादा करतात. रविवारी इंडियन आयडॉलची स्पर्धा सुरू असताना अचानक मंचावर अवतरलेले ते पाच सहा सेटदादा. परीक्षक विशाल दादलानी, हिमेश रेशमिया यांना काही कळेना. आपल्याच सेटचे सेटदादा आयडॉलच्या मंचावर का आले हेच उलगडेना. पण त्यानंतर तिथे उलगडा झाला, तो इंडियन आयडॉलच्या सेटवर झाडण्याचं काम करणारा सेटदादा युवराज त्याच स्पर्धेत स्पर्धक म्हणून उतरत होता. त्या आपल्या मित्राचा उत्साह वाढवण्यासाठी हे सेटदादा सेटवर अवतले होते.
सेटदादांनी युवराजचं नाव घेतलं आणि युवराज सेटवर आला. एरवी इतर स्पर्धकांच्या तुलनेत खूपच साधा, सोबर.. कुठलाही मेकअप वा उंची कपडे परिधान न केलेला युवराज आता काय गाणार आणि कसं गाणार याची उत्सुकता सर्वांना होती. आणि बघता बघता म्युझिक सुरू झालं. अस्सल मराठी कानसेनाने लगेच ओळखावं असे ते सूर होते. युवराजने गाणं निवडलं होत, नटरंगमधलं खेळ मांडला. बघता बघता युवराज गाऊ लागला आणि परीक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं.
हिमेश रेशमिया तर त्याच्या गाण्यातल्या हरकतीने आवाक झाला. चकित होतानाच गाण्यातल्या भावतरंगाने त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. नेहा कक्कर, विशाल दादलानी आदी सगळी मंडळी चकित झाली. परीक्षकांनी उभं राहून युवराजच्या गाण्याचं कौतुक केलं. तो गातो कसा आणि कधीपासून हा प्रश्न त्यांनाही पडला. यावेळी युवराज म्हणाला, 'मी या सेटवर स्वच्छतेचं काम करतो. मी सेट झाडत असताना काही गायक रियाज करायचे.. काही लोक गायचे. मग त्यानंतर तुम्ही परीक्षक मंडळी त्यांना त्यांच्या चुका दाखवायचात. त्या मी लक्षात ठेवायचो. आणि मग तसं गायचा प्रयत्न करायचो. असं करत करत माझं मीच गायला लागलो. आणि मग आज मी इथे आहे.'
युवराज अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. आता त्याची ही क्लिप चांगलीच व्हायरल होते आहे. नव्या जगातला हा एकलव्य पाहून प्रत्येकजण आवाक झाला आहे. अर्थात त्या द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता. आता या एकलव्याचं गाणं ऐकून हे द्रोणाचार्य त्याच्याकडून काही मागतात की त्याला काही देऊ करतात ते कळेल लवकरच.
इतर महत्वाच्या बातम्या :
राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक, मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु