मुंबई : 1990 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी'मधून एका रात्रीत स्टार बनलेले अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला. कारगिलमध्ये 'LAC - लिव्ह द बॅटल'च्या चित्रीकरणादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. सध्या त्यांना उपचारांसाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार 54 वर्षीय अभिनेते राहुल रॉय यांना सात दिवसांपूर्वी कारगिलमध्ये चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावेळी त्यांना श्रीनगरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.


एबीपीने अधिक माहितीसाठी राहुल रॉयचे मेहुणे रोमिर सेन यांच्याशी फोनवरुन संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, राहुल मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. राहुल रॉय यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून प्रकृतीविषयी फार चिंतेची बाब नाही. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. र उनकी तबीयत में सुधार हो रहा है." तर राहुल रॉय यांची बहिण प्रियंका रॉय यांनीही आपल्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं.


राहुल रॉय यांनी महेश भट्टच्या 'आशिकी' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी 'सपने साजन के', 'फिर तेरी कहानी याद आई', 'जनम', 'प्यार का साया', 'जुनून', 'पहला नशा', 'गुमराह' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण 'आशिकी' सारख्या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करुनही त्यांना बॉलिवूडमध्ये आपली विशेष स्थान प्रस्थापित करता आलं नाही.


दरम्यान राहुल रॉय यांनी 2006 मध्ये प्रसारित झालेल्या 'बिग बॉस'मध्ये सहभाग घेतला होता आणि ते या शोचे पहिले विजेते ठरले होते.