Milind Gawali Shared Emotional Post: अवघ्या महाराष्ट्रभरात प्रचंड गाजलेल्या 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. एक, दोन नाहीतर तब्बल पाच वर्ष मालिकेनं प्रेक्षकांना बांधून ठेवलं. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, ईशा, यश यांसारख्या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिका निरोप घेतेय हे समजल्यावर अनेकांच्या डोळ्यांत आसवं दाटली होती. प्रेक्षकांना एवढं वाईट वाटलं, तर मग विचार करा, ज्यांनी तब्बल पाच वर्ष त्या मालिकेतील पात्र म्हणून जगली, ती पात्र छोट्या पडद्यावर तुम्हा आम्हा समोर जीवंत केली, त्यांना काय वाटत असेल? मालिकेतील जवळपास सर्वच कलाकारांनी त्यांच्या भावना सोशल मीडियामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. सध्या मालिकेतील अनिरुद्धच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


मालिकेच्या सेटवर सामान घेण्यासाठी मिलिंद गवळी (Milind Gawali) गेले होते. त्यावेळी मालिकेत दाखवण्यात आलेल्या समृद्धी बंगल्याचं तोडकाम सुरू होतं. पाच वर्ष आपल्या घराप्रमाणे ज्या वास्तूत वावरलो त्या वास्तूचं पाडकाम पाहून मिलिंद गवळी यांचा कंठ दाटला. त्यावेळी त्यांच्या मनात ज्या भावनांचं काहूर माजलं, त्याच भावना त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यात. 


बंगला पडताना पाहून मलिंद गवळींचा कंठ दाटला...


मिलिंद गवळींनी आपल्या इनस्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "19 नोव्हेंबर ला 2024 "आई कुठे काय करते"चं  रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं, 20 तारखेला मतदान, आणि 21 तारखेला "आता होऊ दे धिंगाणा 3" चं "आई कुठे काय करते" च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं, म्हणून मग 22 तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रूम मध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो, बंगल्याचा सेटिंग चा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं, मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच नाही आला, हीच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून  बिनधास्त वावरत होतो, गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रक मध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक."
   
"आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर, आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता, अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं, त्यातली माणसं खरी खरी वाटत होती, आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली, एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं, यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक, आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपती च्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते, आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करून टाकली जाते, तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकेंचं होत असावं...", असं मिलिंद गवळी म्हणाले. 






"खरंतर हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं एक कथा येते, त्या कुटुंबाला शोभणार घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो, राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो, स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये 40 लोकेशन तयार केली गेली होती, अक्षरशः कोर्ट रूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसिअस, आश्रम, हॉस्पिटल्स, 90% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं, फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो, ते पण दोन चार किलोमीटरच्या परिसरात, तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डी के पी च्या अनुपमाच्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचे रोप माझ्यासाठी राखून ठेवलं, ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणाला नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय.", असं मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलंय. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वर्षाचा शेवटचा महिना, पण मनोरंजनाचा धमाका; बॉक्स-ऑफिसवर धुमाकूळ घालणार 'हे' मोस्ट अवेटेड चित्रपट