Maharashtrachi Hasyajatra : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टिव्हीवरच्या मनोरंजनाची प्रत्येकाची वेळ ठरलीये. लाडके कलाकार पुन्हा एकदा निखळ विनोदाच्या माध्यमातून हसवायलाही सज्ज झालेत. पण त्याआधी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील एका कलाकाराचं वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आलंय.
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या टीमने नुकतीच प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये हास्यजत्रा फेम रोहित माने शिवालीच्या उत्तरावर मला पुन्हा एकदा लग्न करावं लागेल वाटतं असं म्हटलं आणि एकच हाशा पिकला. सध्या रोहितच्या या वक्तव्याची बरीच चर्चा सुरु आहे.
रोहित मानेच्या उत्तराने वेधलं लक्ष
मुलाखतीमध्ये खेळ खेळताना शिवाली प्रत्येकजण कोणतं कार्टून आहे, याविषयी सांगत होता. त्यावेळी शिवालीने म्हटलं की, माझ्यासाठी रोहित शिजुका आहे. मी खूप लहान होते, कॉलेजमध्ये वैगरे... आणि रोहित नाटक वैगरे करायचा आणि मी त्याला बघायला जायचे, माझं क्रश होता तो... याचं एक नाटक मी आठ ते नऊ वेळा बघितलं आहे. नोबितासाठी शिजुका कशी आहे, तसं माझ्यासाठी रोहित आहे. त्यावर रोहित म्हणाला की, आता मला दुसरं लग्न करावं लागतंय वाटतंय...
महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम बंद होता. पण पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्यामुळे हास्यजत्रेची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालीये. रोहित माने, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, ही कलाकार मंडळी पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवर सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तिन्ही दिवस दररोज रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.