Mahaminister : दार उघड वहिनी...दार उघड...असं म्हणत आदेश बांदेकरांनी 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सुरू केला. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाने म्हणजेच 'महामिनिस्टर'ने (Mahaminister) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. नुकताच 'महामिनिस्टर'चा महाअंतिम सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या महापैठणीच्या मानकरी लक्ष्मी ढेकणे ठरल्या आहेत.
11 लाखांच्या पैठणीसाठी 10 जणींमध्ये रंगला सामना
महाराष्ट्रात 'महामिनिस्टर' या पर्वाच्या सुरुवातीपासूनच 11 लाखांच्या पैठणीची चर्चा सुरू होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 11 लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. पण रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी महापैठणी पटकावली आहे.
टॉप 10 मध्ये कोण होत्या?
11 लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात 1.25 लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि नंतर याच 10 महिलांमध्ये 11 लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगला.
आता सुरू होणार 'खेळ सख्यांचा चारचौघींचा'
'महामिनिस्टर'नंतर आता होम मिनिस्टरचं नवं पर्व 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 27 जूनपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' या कार्यक्रमाची उत्सुकता दिसून येत आहे. उद्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या