Jay Dhudhane in Star Pravah Serial : नव्या मालिकांच्या प्रवाहामध्ये स्टार प्रवाहने (Star Pravah) त्यांच्या तिसऱ्या नव्या मालिकेची घोषण केलीये. स्टार प्रवाहकडून नुकतच या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. येड प्रेमाचं लागलं (Yed Lagla Premacha) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून विशाल निकम (Vishal Nikam) आणि पूजा बिरारी (Pooja Birari) ही नवी जोडी झळकणार आहे. तसेच या मालिकेत बिग बॉस सिजन 2 फेम जय दुधाणे (Jay Dhudhane) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आलीये.
या नव्या मालिकेत विशाल कदम हा रायाच्या भूमिकेत तर पूजा ही मंजिरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मराठी टीव्ही इन्फो या इंस्टाग्राम पेजवर ही माहिती देण्यात आलीये. पण मालिकेचा जो प्रोमो शेअर करण्यात आलाय त्यामध्ये जय दुधाणे दिसत नाहीये. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीवर काही प्रमाणात संभ्रम होता. पण जय हा या मालिकेत दिसणार असल्याचं आता सांगण्यात येत आहे. तसेच या मालिकेत नीना कुळकर्णी, अतिशा नाईक हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.
जय साकारणार 'ही' भूमिका
दरम्यान या मालिकेचा नवा प्रोमो शेअर झाल्यानंतर या मालिकेच्या कथेबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यातच ही मालिका 'मेहेंदी हैं रचनेवाली' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. या मालिकेमध्ये जय हा पूजाच्या नवऱ्याची भूमिका साकारणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय. तसेच यामध्ये जय आणि पूजा लग्न झाल्यानंतर त्याचा मृत्यू होणार आणि त्यानंतर विशाल आणि पूजाची कथा सुरु होणार, अशा चर्चा सोशल मीडियावर आहेत.
कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता तर साधी माणसं ही मालिका संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेली आई कुठे काय करते या मालिकेला वाहिनीचा दुपारचा स्लॉट देण्यात आलाय. तसेच 7 वाजता लागणारी कुन्या राजाची गं तु राणी या मालिकेचा शनिवार 16 मार्च रोजी शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता या नव्या मालिकेसाठी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की कोणत्यातरी मालिकेची वेळ बदलली जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.