Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण या आठवड्यात त्यांचे लाडके बालकलाकार महाराजांना त्यांच्या इवल्याश्या हाताने पदार्थ करून देणार आहेत.
अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची कन्या दुर्वा गुरु, नाळ चित्रपटातील चेत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे आणि गायक मंगेश बोरगावकर यांची चिमुकली मीरा बोरगावकर किचन कल्लाकारच्या आगामी भागात सहभागी होणार आहेत. ही बच्चेकंपनी किचनमध्ये तर कल्ला करणारच आहे पण त्यांची धमाल मजा मस्ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल.चिमुकली मीरा तिच्या बाबांना जर ते शाळेत जात असतील तर त्यांना आई म्हणून सूचना देताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर मुलं आणि त्यांचे वडील यांच्यासोबत कार्यक्रमात मजेदार गेम्स देखील पाहायला मिळतील.
या किचन कल्लाकारच्या मंचावर कोण सगळ्यात जास्त छान पदार्थ बनवून महाराजांना खुश करणार आणि बच्चेकंपनी आपल्या निरागसतेने प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार हे प्रेक्षकांना 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
याआधी किचन कल्लाकारच्या मंचावर प्रेक्षकांची लाडकी ‘परी’ म्हणजे मायरा वायकुळ, सारेगमपची फायनलिस्ट स्वरा जोशी आणि ‘खारी बिस्कीट’मधली ‘खारी’ म्हणजे वेदश्री खाडिलकर सहभागी झाली होती. या बच्चेकंपनीने चांगलीच धमाल केली होती.
महाराज नेहमी कलाकारांना काहीतरी कठीण पदार्थ करायला लावतात. मात्र, आता या बच्चेकंपनीला महाराज कोणता पदार्थ करायला सांगणार, हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. आता या लहानग्यांचे लहान हात किचनमध्ये काय मोठी कमाल करून दाखवणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. आता ही चिमुकली मंडळी त्यांच्या चिमुकल्या हाताने काय गोड गोड खाऊ बनवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 'किचन कल्लाकार'च्या मंचावर नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात. या मंचावर कधी राजकारणी नेते येतात, तर कधी बच्चे कंपनी त्यामुळे प्रेक्षकदेखील 'किचन कल्लाकार' कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात.
संंबंधित बातम्या