मुंबई : झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला मालिकेचा शेवटचा भाग पाहायला मिळणार आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मालिका निरोप घेणार असल्याचं सांगितलं.


25 सप्टेंबर 2017 रोजी खासदार अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर आणला. संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला. आता मालिका संपत असताना डॉ. अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडीओ ट्वीट करत 'एक प्रवास कधीच न विसरता येणारा……' असं कॅप्शन दिलं आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर डॉ. अमोल कोल्हे मालिकांतून विश्रांती घेणार

'शिवबंधन' तोडून घड्याळ हाती

"सुरु झालेला प्रत्येक प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चितच असतं. काही प्रवास मात्र खूप काही देऊन जातात. खूप काही शिकवतात. कर्तव्यपूर्तीची अनुभूती आणि स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात. असाच एक प्रवास काळजाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखा छत्रपती संभाजी महाराजांची गाथा. स्वराज्यरक्षक संभाजी," असं अमोल कोल्हे या व्हिडीओमध्ये बोलत आहेत.



खरंतर मालिकेच्या शेवटच्या प्रसंगाचं चित्रीकरण 31 जानेवारीलाच पूर्ण झालं आहे. तर येत्या 14 फेब्रुवारीला मालिकेची संपूर्ण टीम वढू बुद्रूक इथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. हे आपल्याला मालिकेच्या शेवटच्या भागात म्हणजेच 28 फेब्रुवारीला पाहायला मिळेल. दरम्यान मालिकेचं शूटिंग पूर्ण होताच अमोल कोल्हेने आपला लूकही बदलला आहे.

ही मालिका सुरु असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला.