पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले डॉ. अमोल कोल्हे मालिकांपासून काही काळ दूर राहणार आहेत. 'झी मराठी' वाहिनीवर सुरु असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पूर्ण झाल्यानंतर डॉ. कोल्हे काही काळ विश्रांती घेणार आहेत. वैयक्तिक कारणांमुळे मनोरंजन विश्वातून सुट्टी घेण्याची घोषणा डॉ. कोल्हेंनी केली.


'शिवबंधन' तोडून घडयाळ हाती बांधल्यानंतर ते शिरुर लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. निवडणुकीचा प्रचार आणि संभाजी महाराजांच्या मालिकेचं चित्रीकरण या दोन्ही गोष्टींना सध्या ते वेळ देत आहेत. मात्र ही तारेवरची कसरत करताना अमोल कोल्हेंची दमछाक होत असल्याचं म्हटलं जात आहे.

निवडणुका आणि मालिकेचं चित्रीकरण असं दुहेरी काम सांभाळताना काहीसा ताण अमोल कोल्हेंना येताना दिसत आहे. त्यामुळेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पूर्ण करुन ते काही काळ मालिकांपासून दूर राहतील.

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीने थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबला. अजित पवारांनी जाहीर मतदान घेऊन खासदारकीच्या उमेदवारीसाठी उपस्थितांची पसंती जाणून घेतली. तेव्हा डॉ. अमोल कोल्हेंना भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

'तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी हा निर्णय घेत आहे' असं म्हणत डॉ. अमोल कोल्हेंनी एक मार्चला राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता.

डॉ. अमोल कोल्हेंचा प्रवास

डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कोल्हेंच्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. 19 मार्च 2014 रोजी कोल्हेंनी शिवसेनेचा भगवा हाती धरला होता. प्रत्यक्षात त्यावेळी ते मनसेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र पुणे महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी चालली नाही.

अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं होतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोल्हेंनी लिहिलं होतं.

डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती. छत्रपती संभाजी राजे मालिकेत सध्या डॉ. कोल्हे हे शंभूराजेंची भूमिका साकारत आहेत.
संबंधित बातम्या

डॉ. अमोल कोल्हेंच्या मुलीचं टीव्हीवर दमदार पदार्पण

शिरुर लोकसभेचा उमेदवार कोण हवा? अजित पवारांचं जाहीर वोटिंग, अमोल कोल्हेंच्या नावानंतर जल्लोष

कोणी कितीही कोल्हेकुई करुदे, निवडणूक मीच जिंकणार, शिवाजीराव पाटलांचा टोला