Tejasswi Prakash Birthday : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली. या शोमधून तिला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळाली आहे. 10 जून 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे जन्मलेल्या तेजस्वी प्रकाशचा ‘बिग बॉस 15’ची विजेती होण्यापर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक होता. इंजिनियर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या तेजस्वी प्रकाशने भारतीय टेलिव्हिजनच्या जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मुंबईतील वायंगणकर या मराठमोळ्या कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब संगीत क्षेत्राशी निगडीत आहे. तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे. तेजस्वीने सुमारे चार वर्षे भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतले.
इंजिनियर ते अभिनेत्री असा प्रवास
तेजस्वीला इंजिनियर व्हायचे होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अभ्यासादरम्यान तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. या दरम्यान ‘मुंबई फ्रेश फेस’ स्पर्धा जिंकल्यानंतर, वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये तिची छायाचित्रे येताच तिचे आयुष्य बदलले. दुसऱ्याच दिवशी एका प्रॉडक्शन हाऊसचा फोन आला. यानंतर तेजस्वी प्रकाशने अभिनयात नशीब आजमावण्यासाठी आणि टीव्ही इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी इंजिनियरिंग सोडून अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकले.
छोट्याशा भूमिकेतून पदार्पण
‘लाइफ ओके’ टीव्ही चॅनलवरील सस्पेन्स-थ्रिलर टीव्ही मालिका ‘2612’ द्वारे तेजस्वी प्रकाशचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले होते. यानंतर तेजस्वी प्रकाशने कधीही मागे वळून पाहिले नाही. 2013 मध्ये ती टीव्ही मालिका ‘संस्कार- धरोहर अपनो की’मध्ये दिसली होती. परंतु, तेजस्वीला खरी ओळख 2015मध्ये आलेली कलर्स टीव्हीची मालिका ‘स्वरागिनी’ने मिळवून दिली. यामध्ये तिने रागिणीची भूमिका केली होती. यानंतर, 2018 मध्ये ती ‘कर्ण संगिनी’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ अशा हिट मालिकांमध्ये देखील दिसली.
तेजस्वी प्रकाश 2017मध्ये सोनी टीव्ही प्रदर्शित झालेल्या ‘पेहरेदार पिया की’ या मालिकेत दिया सिंगच्या भूमिकेत दिसली होती. परंतु, बालविवाहाच्या कथेमुळे, मालिका प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी वादात सापडली होती. मालिका आणि तेजस्वी प्रकाश अनेक दिवसांपासून या वादांमुळे चर्चेत होते. यामुळे लागेचच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
मराठी चित्रपट आणि संगीत अल्बममध्येही केलेय काम
यानंतर तेजस्वी इतर अनेक टीव्ही मालिका आणि फियर फॅक्टर खतरों के खिलाडी सीझन-10 मध्ये दिसली. याशिवाय तेजस्वी प्रकाश बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटातही दिसणार आहे. कोरोनामुळे त्याचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले होते. तेजस्वी प्रकाशने ‘सुन जरा’, ‘ए मेरे दिल’, ‘फकिरा’, ‘दुआ है’ आणि ‘मेरा पहला प्यार’ या म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे.
हेही वाचा :
PHOTO : तेजस्वी प्रकाश परदेशी साजरा करणार यंदाचा वाढदिवस, करण कुंद्राही असणार सोबत!
Tejasswi Prakash : लॉक अपमध्ये ‘वॉर्डन’ बनण्यासाठी तेजस्वी प्रकाशने घेतलं ‘इतकं’ मानधन!