Gharo Ghari Matichya Chuli : रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सुरु आहे सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम. खरंतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला. मात्र सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं. संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रसोबतच लग्न करायचं आहे. त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखलाय. सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंग ऐवजी सौमित्रसोबतच लग्न करण्याचा तिचा डाव आहे. ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
ऐश्वर्याचं लग्न सौमित्रसोबत होणार की सारंगसोबत याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय. हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे. मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.
नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली
कवयित्री विमल लिमये यांची 'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,' ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारत आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे.भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली होती की, ‘रंग माझा वेगळा मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती. स्टार प्रवाहने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन जानकी साकारण्याची संधी दिली आहे.
रेश्मा पुढे म्हणाली,"जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली".
संबंधित बातम्या