Fu Bai Fu : 'फू बाई फू' (Fu Bai Fu) हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण या कार्यक्रमाला चांगला टीआरपी मिळत नसल्याने चॅनलने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम पहिल्या 30 मालिकांमध्येदेखील नाही. 


'फू बाई फू'चं पहिलं पर्व खूप गाजलं होतं. त्यामुळे प्रेक्षक या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी या कार्यक्रमाचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम मागे पडल्याने महिन्याभरातच हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला आहे. 






'या' दिवशी होणार शेवटचा भाग शूट


'फू बाई फू' या कार्यक्रमाचा शेवटचा भाग 8 डिसेंबर 2022 रोजी शूट होणार आहे. महिन्याभरात हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. 'फू बाई फू'च्या नव्या हंगामात ओंकार भोजने, भूषण कडू, नेहा खान, सागर कारंडे, पंढरीनाथ कांबळे, कमलाकर सातपुते, प्राजक्ता हनमकर, माधवी जुवेकर हे दिग्गज विनोदवीर सहभागी झाले होते. कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि अभिनेता उमेश कामत 'फू बाई फू' या कार्यक्रमाच्या परिक्षणाची धुरा सांभाळत होते. तर वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती.


लवकरच सुरू होणार 'या' मालिका


झी मराठीवर येत्या 21 डिसेंबरपासून 'लोकमान्य' ही मालिका सुरू होणार आहे. बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात. तसेच 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' ही मालिकादेखील 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 10 वाजता प्रेक्षक पाहू शकतात. दोन्ही मालिकांचे प्रोमो आऊट झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता या नव्या मालिकांची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Akshaya Hardeek Wedding : "मला माझ्या लग्नात नऊवारी, खोपा, दागिने..."; लग्नानंतर पाठकबाईंची पोस्ट चर्चेत