Dholkichya Talavar Winner Neha Patil : 'ढोलकीच्या तालावर' (Dholkichya Talavar) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून कोकणची शान नेहा पाटील (Neha Patil) या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. 


नेहा पाटील ठरली 'ढोलकीच्या तालावर'ची विजेती


लावणीवर ठेका धरत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणारी नृत्यांगना नेहा पाटील 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. नेहा पाटीलने सोशल मीडियावर 'ढोलकीच्या तालावर'च्या मंचावरील एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"कॅप्शन लिहिण्याची काही गरज नाही". 


नेहा पाटीलची खास पोस्ट (Neha Patil)


नेहा पाटीलने विजेतेपद पटकावल्यानंतर खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"निशब्द...ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाने मला महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी अशी नवी ओळख मिळवून दिली आहे. आज माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं. खऱ्या अर्थाने मी केलेल्या मेहनतीचं तुमच्यासारख्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमाचं, माझ्या सर्व नृत्य दिग्दर्शकांनी केलेल्या कष्टाचं फळ झालं". 






नेहाने पुढे लिहिलं आहे,"नृत्य, श्रृंगार आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम लावणी...लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाने आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, लोककला जपून ठेवली आणि आपल्या लावणीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं". नेहाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहेत. 


'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाचा शुभम बोराडे प्रथम उपविजेता तर नम्रता सांगुळे द्वितीय उपविजेती ठरली आहे. महाअंतिम फेरीपर्यंत समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर, तनुजा शिंदे, शुभम बोराडे आणि नेहा पाटील हे सहा जण पोहोचले होते. या सहा जणांमध्ये नेहा पाटीलने बाजी मारली आहे.


'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाचं परीक्षण क्रांती रेडकर, अभिजित पानसे आणि आशिष पाटील यांनी केलं होतं. तर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. 


संबंधित बातम्या


Priya Berde: “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी; व्हिडीओ व्हायरल