Dada Kondke Movies : विनोदाचा सम्राट दादा कोंडके (Dada Kondke) यांनी मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीही गाजवली. दादा कोंडकेंच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आता दादांचे ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांना पुन्हा एकदा घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. यात 'वाजवू का' (Vajau Ka), 'तुमचं आमचं जमलं' (Tumcha Aamcha Jamla) आणि 'मुका घ्या मुका' (Muka Ghya Muka) या सिनेमांचा समावेश आहे.
'वाजवू का' (Vajau Ka), 'तुमचं आमचं जमलं' (Tumcha Aamcha Jamla) आणि 'मुका घ्या मुका' (Muka Ghya Muka) या सिनेमांचा आनंद प्रेक्षकांना आणि दादांच्या चाहत्यांना घरबसल्या मिळणार आहे. दादांच्या ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी मिळणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. झी मराठीवर प्रेक्षकांना हे सिनेमे पाहता येणार आहेत.
सिनेमांच्या माध्यमातून दादांना मानाचा मुजरा
दादा कोंडके यांनी आपल्या विनोदी अभिनयाने सत्तरच्या दशकात लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच वेड लावलं. दादा कोंडकेंच्या सिनेमांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. दादा कोंडके यांनी 1969 मध्ये 'तांबडी माती' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केंल. या सिनेमापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 1994 मध्ये 'सासरचं धोतर' या सिनेमापर्यंत येऊन थांबला. अशातच आता दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या सिनेमांची मेजवानी झी मराठीने प्रेक्षकांसाठी आणली आहे. 8 ऑक्टोबरपासून द रविवारी दादांचे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमांच्या माध्यमातून दादांना मानाचा मुजरा दिला जाणार आहे.
दादांनी जिंकली प्रेक्षकांची मनं...
सत्तरच्या दशकातील मराठी सिनेमा आठवून बघा. तमाशापटांचा काळ सरला होता आणि विनोदी सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. गावरान मातीतला अस्सल विनोद, रोजच्या जगण्यातील कथा, खळखळून हसवणारे विनोदी संवाद यांची गट्टी जमवून दादा कोंडके नावाचं एक पर्व मराठी सिनेमासृष्टीत दाखल झालं.
1969 ला पडद्यावर आलेल्या ‘तांबडी माती’ या सिनेमाने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे रत्न मराठी सिनेमाला दिले. त्यानंतर गेली 50 वर्षे दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमाची पारायणं करत सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. आजच्या तरूणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो , यातच दादांनी प्रेक्षकांची मनं कशी जिंकली आहेत हे दिसून येतं.
संबंधित बातम्या