मुंबई : सर्वतोपरी घेतली जाणारी काळजी, कोरोना चाचण्यांचं राज्य सरकारला दिलं गेलेलं आश्वासन, त्यासाठी दर्शवली गेलेली तयारी एकिकडे तर दुसरीकडे राज्यात आयपीएलला मिळालेली परवानगी,  राज्यात वृत्तवाहिन्यांच्या चित्रिकरणासाठी दिली गेलेली परवानगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मालिकांमधून जाणारा ओरिजिनल कंटेंट बंद झाला तर पहिल्या लॉकडाऊनंतर पुन्हा मिळवलेला प्रेक्षक आयपीएलकडे जाण्याची असलेली भीती. यामुळे मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या हिंदी मालिका आता परराज्यात गेल्या आहेत. यात अग्रेसर आहेत, ती गोवा आणि आंध्र प्रदेश. 


महाराष्ट्रात असलेली अनिश्चितता लक्षात घेऊन मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर चित्रिकरणासाठी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यावर कोणीही अधिकृतरित्या भाष्य करायला तयार नाही. अनेक मालिकांना बाहेर जाण्याचा पर्याय सर्वच हिंदी वाहिन्यांनी निर्मात्यांना दिला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका मोठ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं, आम्ही सगळी काळजी घेतली होती. आरटीपीसीआर सक्तीचा केला होता. शिवाय, दर आठवड्याला एंटीजेन टेस्टही करायचं ठरलं होतं. तसे अहवाल पाठवले जात होते. इतकी काळजी घेऊन ब्रेद द चेनमध्ये चित्रिकरण बंद केली गेली. त्याचवेळी दुसरीकडे आयपीएलला परवानगी आहे. मालिका, सिनेमांची चित्रिकरणं बंद करतानाच वृत्तवाहिन्यांच्या चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. आमच्या चित्रिकरणाचा संच ठरलेला आणि कंट्रोल्ड असतो. वृत्त वाहिन्यांचं तसं नसतं. तिकडेही अनेक कोरोनाग्रस्त झाले आहेत. एकतर आमच्यासमोर आयपीएलचं आव्हान आहे. ते पेलण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना आम्हाला ओरिजिनल कंटेंट थोड्या प्रमाणात का असेना द्यावाच लागेल. अन्यथा महाप्रयत्नाने मिळवलेला आमचा प्रेक्षक पुन्हा आयपीएलकडे जाईल. मग त्याला वळवण्यात पुन्हा संघर्ष करावा लागेल. 


मनोरंजनसृष्टीची आजची उलथापालथ ही जवळपास 35 हजार कोटींची आहे. या सगळ्यालाच महाराष्ट्रात ब्रेक लागला आहे. आत्ता सगळं अर्थकारण थांबून चालणारं नाही. शिवाय, राज्यात अनिश्चितताही आहे. म्हणून सरळ राज्याबाहेरच्या पर्यायाचा विचार होतोय. आज महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची चर्चा सुरू झाल्यावर अनेक हिंदी चित्रपटांनी-मालिकांनी आपली चित्रिकरणं गोव्यात हालवली आहेत. आज गोव्यात एक दोन नव्हे तर 16 चित्रिकरणं चालू आहेत. याशिवाय, आज जवळपास 90 टक्के डेली सोप्स राज्याबाहेर गेले आहेत. इतर बरीच चॅनल्स हा पर्याय निर्मात्यांसमोर ठेवतायत, असंही त्या पदाधिकाऱ्याने सांगितलं. 


मालिका मुंबईतून हालतायत असं कळल्यावर हैदराबाद, गोवा आणि उत्तर प्रदेश यांनी ही रेड कारपेट अंथरायला सुरूवात केल्याचं कळतं. यात विविध सवलती, अधिकच्या सुविधा, संघटनामुक्त वातावरण, तातडीने मिळणाऱ्या विविध परवानग्यांचं आश्वासन आणि दरामध्ये सवलत देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. हे सगळं अर्थकारण पाहता, आपल्या किमान तीन मालिका कायम मुंबईबाहेर ठेवण्याचा विचार चॅनल्स करू लागले आहेत. अर्थात यावर कोणाही चॅनलने भाष्य करण्याचं टाळलं आहे. मिळालेल्या माहीतीनुसार एकता कपूरने आपल्या सगळ्या मालिका गोव्यात हालवल्या आहेत. तर झी वाहिनीने आपले डेली सोप्स जयपूर आणि गोव्यात नेले आहेत. स्टार प्लसने आपले बरेच डेली सोप्स हैदराबादला हालवले आहेत. 


जवळपास 90 टक्के डेलिसोप्स राज्याबाहेर गेल्याने राज्याचा जीएसटी बुडणार आहे. शिवाय, या मालिकांना नवा पर्यायही मिळणार आहे. राज्य सरकारने आपली भूमिका बदलली तर हे शो पुन्हा राज्यात येतील कारण, या सगळ्या मालिकांचे सेट्स मुंबईत उभे आहेत, असंही एका निर्मात्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. 


महत्वाच्या बातम्या :