Bus Bai Bus : ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमातून अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व उपस्थित राहणार असून, सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करत असतो. आता सुबोध स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येणार आहे. ही बस महिलांसाठी विशेष असणार आहे. सुबोधचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम हटके असणार आहे. या कार्यक्रमाची महिलावर्गात क्रेझ दिसून येत आहे.
'बस बाई बस' या कार्यक्रमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम नक्की कसा असणार आणि काय धम्माल मज्जा मस्ती होणार यासाठी प्रेक्षकांना 29 जुलैची वाट बघावी लागणार आहे.
असा कार्यक्रम करायची इच्छा होतीच! : सुबोध भावे
अशा प्रकारचा कार्यक्रम सुबोध पहिल्यांदाच करतोय त्यामुळे हा कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना सुबोध म्हणाला, ‘मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.’
अमृता फडणवीसही होणार सहभागी!
या कार्यक्रमात आतापर्यंत चित्रित झालेल्या भागांमधील एक किस्सा सांगताना सुबोध म्हणाला, ‘अमृता फडणवीस जेव्हा मंचावर आल्या होत्या, तेव्हा कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी तो भाग न चुकता बघावा. पण, त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो आणि माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.’
भन्नाट प्रश्नांचे भन्नाट मीम्स!
या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु असताना सोशल मीडियावर सुबोध भावेचे भन्नाट सवाल जवाब प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 'हॉटेलमधू न साबण, शाम्पू घरी घेऊन जात का?', 'तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?', या धमाल प्रश्नावर नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद तर मिळतोच आहे, पण त्याचसोबत अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय सोशल मीडिया अपूर्ण आहे ती म्हणजे मीम्स, ते देखील या सवाल जवाबवर बनताना दिसत आहेत.
हेही वाचा :
Bus Bai Bus : सुबोध भावे महिलांसाठी घेऊन येतोय खास राखीव बस; 'बस बाई बस'चा टीझर आऊट
Subodh Bhave : सुबोध भावेने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे मानले आभार